Piyush Goyal News: उत्तर मुंबईत भाजपाकडून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पीयूष गोयल उत्तर मुंबई मतदारसंघात विविध ठिकाणी जाऊन जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहे. महायुतीचे उमेदवार असलेल्या पीयूष गोयल यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे सांगितले जात आहे. उत्तर मुंबईतील विकास कामांमुळे दहिसरकरांना मोठ्या प्रमाणावर नागरी सुविधा मिळणार असल्याचे प्रतिपादन उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी केले.
दहिसर पूर्व येथील प्रेमनगर येथे त्यांच्या नमो यात्रेला ढोल ताशांच्या गजरात प्रारंभ झाला. तेव्हा भाजपासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. पीयूष गोयल यांनी यावेळी बोलताना उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासाचे आश्वासन दिले. मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्पांवर आणि आरोग्य सेवा आणि शिक्षणातील सुधारणांवर लक्ष केंद्रित केले जाईल, असे ते म्हणाले.
उत्तर मुंबईतील रहिवाशांसाठी एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार
जन आशीर्वाद प्रचार रथासह निघालेल्या या नमो यात्रेत नागरिकांनी पीयूष गोयल यांच्यावर पुष्पवृष्टी केली. उत्तर मुंबईतील रहिवाशांसाठी एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येईल, असे आश्वासन गोयल यांनी दिले. अंबावाडी, दहिसर चांडक, पर्वत नगर, शिवशक्ती कॉम्प्लेक्स परिसर, ओवरीपाडा परिसर येथपर्यंत ही प्रचार फेरी काढण्यात आली. पीयूष गोयल यांच्यासोबत खासदार गोपाळ शेट्टी आणि आ. मनीषा चौधरी उपस्थित होते.
दरम्यान, पीयूष गोयल यांच्या प्रचारासाठी भव्य रॅली काढण्यात आली. हजारो कार्यकर्त्यांनी पीयूष गोयल यांना ज्या प्रकारे अभिवादन केले, त्यावरून ते यावेळी विक्रमी मतांनी विजयी होणार असल्याचे दिसून येते. आम्ही उत्तर मुंबईचे काम पाहतो, आम्ही उत्तर मुंबईचे नेतृत्व करतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राची काळजी घेतात, तसे मी आणि पीयूष गोयल उत्तर मुंबईची काळजी घेत आहोत, असे गोपाळ शेट्टी म्हणाले.