Join us

'आपली चिकित्सा' योजनेची टक्केवारी योजना केली; भाजपाचा उद्धव ठाकरेंवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 9:49 AM

मुंबई महानगरपालिका ही कंत्राटदारांना, अधिकाऱ्यांना व उद्धवसेनेला ‘सोन्याचे अंडे देणारी कोंबडी’ नाहीतर सर्वसामान्यांचा विचार करणारी मुंबई महानगर ‘पालिका’ आहे हे सिद्ध करण्यास तुम्हाला संधी मिळेल असं पत्र माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पालिका आयुक्तांना पाठवलं आहे.

मुंबई - शहरात विविध आजारांचे निदान करण्यासाठी मुंबई महापालिकेने सुरु केलेली आपली चिकित्सा योजना ही टक्केवारी योजना उद्धव ठाकरेंनी करून ठेवली होती. सदर योजनेची प्रभावीपणे जाहिरात न करता योजनेची व्याप्ती मर्यादित ठेवली. त्यामुळे कंत्राटदार कंपनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्याचा फायदा झाल्याचा आरोप करत मुंबई भाजपानं या योजनेवर प्रश्नचिन्ह उभे केले. 

भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी इक्बालसिंह चहल यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात म्हटलंय की,  आधी पूर्वीच्या कंपन्या मनपा अधिकार्‍यांच्या संगनमताने प्रति व्यक्ती २०० रुपये आकारून बीएमसीची लूट करत होत्या. म्हणजे ही योजना पूर्वी ‘आपली चिकित्सा’ योजना नसून ‘आपली टक्केवारी’ योजना उद्धवसेनेने करून ठेवली होती. या गोरगरीब रूग्णांच्या योजनेतही घोटाळे करणे खरतंर ही लाजिरवाणी बाब आहे. माझ्या माहितीप्रमाणे मुंबई महानगर पालिकेने ‘आपली चिकित्सा’ योजना चालवण्यासाठी काढलेल्या सध्याच्या कंत्राटामध्ये मध्ये दोन कंपन्या पात्र ठरल्या आहेत. त्यापैकी एक कृष्णा डायग्नोस्टिक्स ही सर्वात कमी दर देणारी कंपनी ठरली आहे. दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत आणि सध्याच्या दरांच्या तुलनेत सदरील पात्र कंपनीने देऊ केलेले दर ५०% पेक्षा कमी आहेत असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत सध्या सुरू असलेल्या करारामध्ये कंपन्या महापालिकेकडून एका व्यक्तीच्या चाचणीसाठी २०० रूपये घेतात. परंतु नवीन पात्र कंपनीने ८६ रूपये दर देऊ केला आहे. तसेच या अगोदर महापालिकेने  चाचणी न करतासुद्धा किमान चाचणीची दर दिवशीची हमी रक्कम अदा केली आहे. त्यामुळे पुर्वीच्या कंपनीला महिन्याला लाखो रूपयांचा फायदा झाला आहे. आता २०० रूपयांवरून ८६ रूपये ही मोठी कपात आहे. या कपातीचा प्रत्यक्ष फायदा मुंबईतील नागरिकांना झाला पाहिजे. आता मुळातच दर कमी झाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना चाचणीला ५० रूपये न आकारता १० रूपयाची चाचणी फी आकारली पाहिजे. जेणेकरून सर्वसामान्य मुंबईकर, गोरगरीबांना याचा फायदा होईल अशी मागणी प्रभाकर शिंदे यांनी केली. 

दरम्यान, मुंबई महानगरपालिका ही कंत्राटदारांना, अधिकाऱ्यांना व उद्धवसेनेला ‘सोन्याचे अंडे देणारी कोंबडी’ नाहीतर सर्वसामान्यांचा विचार करणारी मुंबई महानगर ‘पालिका’ आहे हे सिद्ध करण्यास तुम्हाला संधी मिळेल. इतर कंपन्यांच्या व टक्केवारीखोरांच्या दबावाला बळी पडू नका आणि ही निविदा पुन्हा काढू नका, सामान्य मुंबईकरांना याचा फायदा मिळू द्या असं आवाहनही प्रभाकर शिंदे यांनी मुंबई पालिका आयुक्तांना केले आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेभाजपा