Join us

"आम्ही ऑपरेशन सुरू करू तेव्हा...", नवी जबाबदारी मिळताच आशिष शेलारांचं शिवसेना खासदाराला ओपन चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 6:20 PM

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपामध्ये खांदेपालट करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागताच भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

मुंबई-

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपामध्ये खांदेपालट करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागताच भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर मुंबई भाजपाचं अध्यक्षपद आमदार आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलं आहे. भाजपा मुंबईच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत मुंबई महापालिकेवर भाजपाची सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला. तसंच पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीका केली. यावेळी आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना ओपन चॅलेंज देखील दिलं. 

"उद्धव ठाकरेंच्या भ्रष्ट शिवसेनेला तडीपार करणार, मुंबईत भाजपाचा महापौर बसवणार’’, आशिष शेलारांचा दावा 

भाजपाकडून माजी नगरसेवकांना आमिष दाखवून ऑपरेशन लोटस चालवलं जात आहे त्यास बळी पडू नये असं आवाहन शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलं आहे. याबाबत शेलार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी अरविंद सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. "अरविंद सावंत यांना माझं ओपन चॅलेंज आहे. त्यांनी आधी स्वत:ची खासदारकी टिकवावी. ज्यावेळी आमचं ऑपरेशन सुरू होईल तेव्हा मुंबईत सर्वात आधी अरविंद सावंत याचं संस्थान खालसा होईल. त्यांनी स्वत:च्या जीवावर येणारी लोकसभा निवडणूक जिंकून दाखवावी. त्यांनी आपली खासदारकी टिकवली तरी खूप आहे", असं आशिष शेलार म्हणाले. 

आता आमचं ठरलंय, मुंबई मनपात बदल अटळ"आता आमचं ठरलंय. मुंबई महानगरपालिकेत यंदा बदल अटळ आहे. यापुढील काळातील आमची वाटचाल त्यादृष्टीनं असेल. मुंबईत भाजपाचं काम अजून कसं चांगलं होईल आणि यशस्वी परिणाम येणाऱ्या मुंबई पालिकेत देऊ याची खात्री मी यावेळी देतो. खरंतर आम्ही दोन दशकं मुंबई पालिकेतील सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करत आहोत. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची बजबजपुरी जी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केली त्याला तडीपार करण्याचं काम मी माझे सहकारी मिळून करू", असं आशिष शेलार म्हणाले. 

टॅग्स :आशीष शेलारभाजपाअरविंद सावंत