Join us

Maharashtra Politics: BMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का! उपाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश; ठाकरेंनी बांधले शिवबंधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 4:11 PM

Maharashtra Politics: आगमी मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपला धक्के देण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे.

Maharashtra Politics: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि भाजप तसेच शिंदे गटातील संघर्ष वाढताना दिसत आहे. यातच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्याचा शिवसेना आणि भाजपने चंग बांधला असून, आरोप-प्रत्यारोप वाढताना दिसत आहे. यातच आता भाजपच्या उपाध्यक्षांनी पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीर ही अतिशय महत्त्वाची घडामोड असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई जिल्हा भाजपच्या उपाध्यक्ष ज्योत्स्ना दिघे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दिघे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, समर्थकांनीही हाती शिवबंधन बांधले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते अनिल परब हेदेखील उपस्थित होते. 

शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

अलीकडेच गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी अगदी केंद्रीय नेतृत्व असलेल्या अमित शाह यांच्यापासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर सडकून टीका केली होती. दसरा मेळावा परंपरेप्रमाणेच होणार. तो शिवतीर्थावरच होणार, असा निर्धार करत, अमित शाहांमध्ये हिंमत असेल, तर मुंबई महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुका एका महिन्यात घेऊन दाखवाव्यात. तसेच भाजपला मुंबईशी काही देणे घेणे नाही. मुंबई आपली मातृभूमी असून, मुंबईवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. 

दरम्यान, जनाबसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वांद्र्यात आमदार जिंकून दाखवावा, नंतर उड्या माराव्यात. सहाव्या नंबरचा पक्ष आणि दस नंबरी नेता. तसेच उद्धव ठाकरे हे तळपते सूर्य आहेत. पण त्यांचा प्रकाश मातोश्रीच्या बिळा बाहेर पडतच नसल्यामुळे क्वचित कधीतरी ते बाहेर पडतात. सत्तेवर असताना मुलाची बेरोजगारी दूर करण्याचे असामान्य कर्तृत्व त्यांनी गाजवले. राज्य गमावल्यानंतर आता महापालिका गमावण्याच्या धास्तीने सध्या घणाघाती बरळतायत, असा पलटवार भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला होता. 

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका निवडणुक 2022मुंबई महापालिका निवडणूक २०२२राजकारणशिवसेनाभाजपा