मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करणं कुणालाही शक्य नाही; संजय राऊतांवर नारायण राणेंचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 06:25 PM2022-04-08T18:25:47+5:302022-04-08T18:25:47+5:30
१९९२ च्या दंगलीत अनिल परबांनी मार खाल्ला असं उद्धव ठाकरे म्हणतात. हे लपून होते. आम्ही रस्त्यावर होतो.
मुंबई – महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीचं मस्त चाललंय. संजय राऊतांना पवारसाहेबांनी काम दिलेय. त्यांना निष्ठा म्हणतात. शिवसेनेला संपवण्याचं काम संजय राऊत चांगल्याप्रकारे करत आहेत. आम्हाला लक्ष द्यायची गरज नाही. आपलं पाप झाकण्यासाठी ही नाटकं सुरू आहेत. शिवसैनिकांच्या हिताचं नाही आणि जनतेच्या हिताचंही नाही. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करणं कुणालाही शक्य नाही. स्वत:चे फ्लॅट जप्त झाले त्याचा राग लोकांवर का काढतोय असा टोला नारायण राणेंनी शिवसेना खासदार संजय राऊतांना लगावला.
नारायण राणे म्हणाले की, संजय राऊत तुम्ही एकाकी पडणार आहात. शिवसेनेचा इतिहास आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांवर खोटे आरोप करून मी धुतल्या तांदळासारखा आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका. चर्तुवेदी हाताला लागले नाहीत. या लोकांचे पैसे कुणी, कुठे गुंतवले आहेत त्याची माहिती माझ्याएवढी कुणाकडे नाही. ४० बसमध्ये किती माणसं बसतात. लाखो माणसं सोबत आली असं म्हणतात. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव हे नवं पिल्लू सोडलं. कोण करणार आहे? आम्ही आहोत ना असं त्यांनी म्हटलं.
तसेच १९९२ च्या दंगलीत अनिल परबांनी मार खाल्ला असं उद्धव ठाकरे म्हणतात. हे लपून होते. आम्ही रस्त्यावर होतो. शिवसेनेच्या जन्मापासून आक्रमकपणे साहेबांना साथ देणारे असंख्य आहेत. त्यांना कोण विचारत आहे. देशात सर्वाधिक खासदार, आमदार असलेला भाजपा पक्ष आहे. मोदींच्या नावावर शिवसेनेचे १८ खासदार झाले. पुढच्यावेळी ८ खासदार आणून दाखवा. निवडणुकीपूर्वी युती केली आणि त्यानंतर गद्दारी करत सत्ता स्थापन केली. मला शिवसेनेचा इतिहास कुणी सांगू नये. बाळासाहेबांनी मला नावारुपाला आणलं. मी त्या घरातील गोष्टी बाहेर आणल्या नाहीत असाही इशारा नारायण राणेंनी दिला आहे.
परिवहन मंत्री अनिल परबांवर गुन्हा दाखल करा
शरद पवार यांच्या घरावर हल्ला होणं योग्य नाही. राज्यात सरकार कायदा सुव्यवस्था सांभाळू शकत नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करू शकत नाही. कोर्टाने सांगूनही एसटी कर्मचाऱ्यांना दमदाटीची भाषा परिवहन मंत्र्यांनी वापरली. परिवहन मंत्री अनिल परबांच्या कामावरून काढण्याच्या धमकीनंतर कर्मचाऱ्यांना भावना दुखावल्या गेल्या. कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. नोकरीवरून काढण्याची धमकी दिली त्यांच्या मुलाबाळांनी काय करायचं? अनिल परबांवर गुन्हा दाखल व्हायला हवा. शेतकरी मजूर, बेरोजगार या प्रश्नाकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावं यासाठी संजय राऊतांना मोकळं सोडलं. मूळ प्रश्न बाजूला ठेवले जातात असंही नारायण राणेंनी म्हटलं.