Join us

नीलेश राणे यांची सक्रिय राजकारणातून निवृत्ती; तर्क-वितर्कांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 6:12 AM

या निर्णयामागे कौटुंबिक वादाची काही किनार आहे का अशीही चर्चा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार नीलेश राणे यांनी ऐन दसऱ्याच्या दिवशी सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या निवृत्तीबद्दल तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

नीलेश यांनी सकाळीच एक्सवरून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. ‘मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे. आता राजकारणात मन रमत नाही. इतर काही कारण नाही. मागच्या १९-२० वर्षांमध्ये सगळ्यांनी मला खूप प्रेम दिले. भाजपमध्ये प्रेम भेटले आणि या उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली; मी खूप नशीबवान आहे. निवडणूक लढण्यात आता मला रस राहिलेला नाही. टीका करणारे टीका करतील; पण जिथे मनाला पटत नाही तिथे स्वत:चा आणि इतरांचा वेळ वाया घालवणे हे मला पटत नाही. कळत नकळत मी लोकांना दुखावले असेल तर त्या बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो’, असे नीलेश राणे यांनी म्हटले आहे. 

वडील नारायण राणे केंद्रात मंत्री असताना आणि बंधू नितेश राणे हे कणकवलीचे आमदार असताना नीलेश यांनी अचानक निवृत्ती का घेतली याची वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. त्यांच्या या निर्णयामागे कौटुंबिक वादाची काही किनार आहे का अशीही चर्चा आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे असलेले उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आपले बंधू किरण सामंत यांनी लढावे, अशी जनतेची मागणी असल्याचे म्हटले होते.

चव्हाण आणि राणे यांच्यात धुसफुस

- या लोकसभा मतदारसंघात सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विनायक राऊत हे खासदार आहेत. २०२४ मध्ये राऊत विरुद्ध किरण सामंत असा सामना होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

- राज्याचे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत. भाजपचेच असलेले चव्हाण आणि नारायण राणे यांच्यात धुसफूस सुरू असल्याचे बोलले जाते. 

- अशा वातावरणात स्वत:ला सक्रिय राजकारणापासून दूर ठेवण्याची भूमिका नीलेश यांनी घेतली असावी, असे म्हटले जाते. नारायण राणे व नितेश राणे  हे नीलेश यांनी राजकीय निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी आग्रही असल्याचे म्हटले जाते.

निवृत्ती हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. माझ्या माहितीप्रमाणे नीलेश राणे हे लोकसभेसाठी इच्छुक नव्हते. किरण सामंत आगामी लोकसभा निवडणुकीत उतरतील, असे मला वाटत नाही. काही टोळक्यांना तसे वाटते. त्या माध्यमातून स्वत:च्या तुमड्या त्यांना भरायच्या असतील हे किरण सामंत ओळखून आहेत. - खा. विनायक राऊत (शिवसेना ठाकरे गट)

 

टॅग्स :निलेश राणे भाजपा