Nitesh Rane: दिशा सॅलियनला ‘त्या’ रात्री घरी नेणारी कार सचिन वाझेची? नितेश राणेंचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 12:06 PM2022-02-22T12:06:02+5:302022-02-22T12:08:15+5:30
Nitesh Rane: मुंबई महापालिका आणि ठाकरे सरकारचा नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी विचारणा नितेश राणेंनी केली आहे.
मुंबई: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान अभिनेता सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) याची मॅनेजर दिशा सालियानबाबत (Disha Salian) गंभीर आरोप केले होते. यानंतर आता नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिशा सॅलियनबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. दिशा सॅलियन पार्टीच्या दिवशी रात्री ज्या कारने घरी गेली, ती कार सचिन वाझेची आहे का, असा मोठा दावा करणारे एक ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
नितेश राणे यांनी एकामागून एक ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मालवणी पोलिसांची भूमिका पहिल्या दिवसापासूनच संशयास्पद राहिली आहे. आणि आता त्यांना दिशा सॅलियन प्रकरणात अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दिशासोबत राहणारा आणि ८ तारखेच्या रात्री उपस्थित असणाऱा रोहित राय पुढे येऊन काहीच का बोलत नाही, अशी विचारणा नितेश राणे यांनी केली आहे.
ही तीच कार आहे का?
आणखी एका ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात की, मुंबईच्या महापौरांनी महिला आयोग आणि त्यानंतर मालवणी पोलिसांना पत्र लिहून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ राज्य सरकारकडून ८ जूनच्या रात्री काहीच झाले नाही असे दाखवण्यासाठी मोठी तयारी सुरु आहे. चला किमान ते आपली कबर खोदत आहेत याचा आनंद आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली. याशिवाय, दिशाला ८ तारखेच्या रात्री काळ्या मर्सिडीजमधून तिच्या मालाडच्या घरी नेण्यात आले. सचिन वाझेकडेही काळी मर्सिडीज आहे जी सध्या तपास यंत्रणांकडे आहे. ही तीच कार आहे का? ९ जूनला त्याला पुन्हा पोलीस खात्यात रुजू करण्यात आले. संबंध? अशी एक शंका नितेश राणे यांनी उपस्थित केली.
नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे?
तसेच मालवणी पोलिसांनी योग्य तपास न केल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. बरोबर ना? आणि आता याच पोलिसांना महिला आयोगाने अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे? हे किती योग्य आहे? नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे? असा प्रश्न नितेश राणेंनी विचारला आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिशा सालियानबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने कारवाई करण्याची मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे केली होती. त्याची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलिसांना ४८ तासांत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्वत: चाकणकर यांनी ट्वीट करीत याबाबत माहिती दिली आहे.