Join us  

Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंवर तेव्हा खूप दबाव होता, नगरविकास खात्याचे निर्णय वरुण सरदेसाईच घ्यायचे” 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 6:23 PM

Maharashtra Political Crisis: कलानगरातून नगरविकास खात्याच्या फाइल्स एकनाथ शिंदे यांच्याकडे यायच्या अन् सह्या करण्यासाठी दबाव टाकला जायचा, असा मोठा दावा भाजपने केला आहे.

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचे पहिलेच अधिवेशन वादळी ठरताना दिसत आहेत. विरोधक महाविकास आघाडी आणि नवे शिंदे-फडणवीस सरकार एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे-भाजप सरकारवर अनेकविध मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडले जात आहे. यातच आता भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नगरविकास खात्याच्या कामकाजावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव होता. वरुण सरदेसाईच या खात्याचे निर्णय घेत होते, असा मोठा दावा नितेश राणे यांनी केला आहे. 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी त्यांच्याच मतावर ठाम होते. एकनाथ शिंदे यांना त्यांचे नगरविकास खाते त्यांच्या मर्जीनुसार कधी चालवायला दिले आहे का, असा प्रश्न उपस्थित करत, त्या वैभव चेंबरमध्ये बसून, वांद्रे-कलानगरमध्ये बसून निर्णय घेतले जात होते. तिथून फाइल पाठवल्या जात होत्या आणि एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणून सही करायला भाग पाडले जायचे, असा मोठा दावा करत नितेश राणे यांनी विधानसभा सभागृहात उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली.

एकनाथ शिंदेंच्या खात्याचे निर्णय वरूण सरदेसाई घ्यायचे

कोण कुठला वरुण सरदेसाई, गेल्या सरकारमध्ये ते कोण होते, का त्यांना सुरक्षितता दिली गेली, का सरकारी बैठकांमध्ये येऊन उपस्थित राहत होते, असे अनेक सवाल उपस्थित करत, एक चांगला माणूस वर्षानुवर्ष शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालतोय, एवढं सोप्प नसतं, असे सांगत नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील उपस्थितीवरून टीकेचे आसूड ओढले.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनाचे तीनही दिवस विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले जात असून, सरकारविरोधी घोषणाबाजी केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. विधिमंडळाच्या तिसऱ्या दिवशी, पन्नास खोके एकदम ओक्के, खावून खावून माजले गद्दार बोके, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.  

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळनीतेश राणे भाजपाएकनाथ शिंदेवरुण सरदेसाईउद्धव ठाकरेशिवसेना