Nitesh Rane: “नंदकिशोर चतुर्वेदीचा मनसुख हिरेन तर झाला नाही ना”; नितेश राणेंनी व्यक्त केली शंका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 01:29 PM2022-03-24T13:29:25+5:302022-03-24T13:30:30+5:30
Nitesh Rane: आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचाही नंदकिशोर चतुर्वेदीशी संबंध आहे का, अशी विचारणा नितेश राणे यांनी केली आहे.
मुंबई: महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमागे सुरू असलेला केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा आता थेट मातोश्रीपर्यंत पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका सील करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. श्रीधर पाटणकरांच्या कंपनीला कर्ज देणारे नंदकिशोर चतुर्वेदी दोन डझनहून अधिक कंपन्यांचे संचालक असल्याचे समोर येत आहे. यातच आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत. याप्रकरणी भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया देताना, नंदकिशोर चतुर्वेदीचा मनसुख हिरेन तर झाला नाही ना, अशी शंका व्यक्त केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. गेल्या वर्षभरापासून ट्विटच्या माध्यमातून नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याविषयी प्रश्न विचारत आहे. चतुर्वेदी नेमके कुठे गेले, त्यांना कोणी गायब केले, हे प्रश्न मी वारंवार विचारले आहेत. माझी ट्विटस त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचली असतील आणि मी काही खोटे बोलत असेल तर त्यांनी माझ्याविरुद्ध कारवाई करावी, , असेही मी म्हटले होते. मात्र, त्यानंतरही नंदकिशोर चतुर्वेदी समोर आली नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
आदित्य आणि रश्मी ठाकरे यांचा नंदकिशोर चतुर्वेदीशी संबंध
आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचाही नंदकिशोर चतुर्वेदीशी संबंध आहे का, अशी विचारणा करत, २०१४ मध्ये आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी कोमो स्टॉक अँड प्रॉपर्टीज नावाची कंपनी सुरु केली होती. २०१९ पर्यंतची या कंपनीची कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यानंतर ही कंपनी नंदकिशोर चतुर्वेदी याच्याकडे गेली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेहुणाच नव्हे तर पत्नी आणि मुलाचाही आर्थिक व्यवहारांशी संबंध आहे का, हे स्पष्ट झाले पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. ईडीने श्रीधर पाटणकर यांच्यावर आरोप नव्हे तर कारवाई केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांत राहून संशय आणखी वाढवू नये. त्यांनी समोर येऊन स्पष्टीकरण द्यावे. जेणेकरून नंदकिशोर चतुर्वेदी याचा मनसुख हिरेन किंवा जया जाधव तर झाला नाही ना, हे समजू शकेल, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नंदकिशोर चतुर्वेदी यांनी हमसफर डीलर प्रा. लि. कंपनी या बनावट कंपनीच्या माध्यमातून ३० कोटींचे विनातारण कर्ज श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीत वळते केले. चतुर्वेदीशी संगनमत करून हा पैसा महेश पटेलने लाटला व तो श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि.च्या बांधकाम प्रकल्पात गुंतवला, असे सांगितले जात आहे.