Maharashtra Political Crisis: “देशात आर्थिक विकासाची गंगा आणणाऱ्या मुंबईची आदित्यसेनेने भ्रष्टाचाराची गटारगंगा केली”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 04:50 PM2022-07-10T16:50:34+5:302022-07-10T16:53:12+5:30
Maharashtra Political Crisis: मुंबईची तुंबई करून दाखवली, अशी टीका भाजपकडून शिवसेनेवर करण्यात आली आहे.
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवायला सुरुवात केली आहे. एकीकडे सत्ता संघर्षामुळे राजकीय वातावरण तापलेले असताना, दुसरीकडे मात्र राज्यभरात वरुण राजा तुफान बरसताना दिसत आहे. अनेक ठिकाणी अद्यापही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यातच मुंबईत अनेक ठिकाणी यंदाही पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. यावरून आता भाजपने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
पावसाला सुरुवात होताच मुंबईत अनेक ठिकाणी नाले तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत. नाले तुंबल्यामुळे रस्त्यावरच पाणी साचून राहत आहेत. याचा मनस्ताप स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत आहेत. या मुद्द्यावरून आता भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. नितेश राणे यांनी एक ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मुंबईतील परिस्थिती दयनीय असल्याचे दाखवण्यात आले आहे.
आदित्यसेनेने भ्रष्टाचाराची गटारगंगा केली
देशात आर्थिक विकासाची गंगा आणणाऱ्या आपल्या मुंबईला आदित्यसेनेने ठेकेदारांसाठी भ्रष्टाचाराची गटारगंगा केली आहे, अशी कॅप्शन नितेश राणे यांनी ट्विटला दिली आहे. नितेश राणे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत, आदित्य ठाकरे यांनी केलेली विधानं कशी फोल ठरली आहेत, याची तुलना केली आहे. मुंबईतील अनेक रस्त्यावर पाणीसाचून नागरिकांना त्रास होत असलेले व्हिडिओमध्ये दिसत आहे. पहिल्याच पावसाने केली मनपाची पोलखोल, नालेसफाईच्या कामात झालाय झोल, टक्केवारी वीरांनी मुंबईकरांचे ५ हजार कोटी बुडवून दाखवले, कंत्राटदार आले पैशात न्हाऊन, मुंबईकर गेला पावसात वाहून, मुंबईची तुंबई करून दाखवली, अशी खोचक टीका करण्यात आली आहे.