“मग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय?”; राणेंचे महापौरांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 12:37 PM2021-09-16T12:37:43+5:302021-09-16T12:39:29+5:30
मग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय? हे तरी सांगा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एकीकडे पेंग्विनच्या देखभालीचा वाद रंगला असताना भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन कक्षात दोनदा पाळणा हलला आहे. राणीच्या बागेतील ही गोड बातमी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी महापौर किशोरी पेडणेकरांना पत्र लिहून जोरदार निशाणा साधला आहे. लहान मुलांना पाहता यावे म्हणून हा पेंग्विन कक्ष बनवला. पण मुंबईतील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करताना राणीबागचे दरवाजे मुलांसाठी खुले केले गेले नाहीत, मग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय? हे तरी सांगा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. (bjp nitesh rane criticizes shiv sena mumbai mayor kishori pednekar over penguin)
“उत्तर प्रदेशातील निवडणूक भाजपने आरपीआयसोबत लढली पाहिजे”: रामदास आठवले
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात सन २०१७ मध्ये दक्षिण कोरियातून हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले. त्यासाठी विशेष वातानाकुलित कक्ष व पेंग्विन खरेदीसाठी एकूण २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतर तीन वर्षांच्या देखभालीसाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात आले. आता पुन्हा पुढच्या तीन वर्षांसाठी १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. यावरून विरोधकांकडून टीका केली. सर्व विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता पालिका हे कंत्राट गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आता नितेश राणे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून टीकास्त्र सोडले आहे.
“अयशस्वी देशाकडून धडे घेण्याची गरज नाही”; काश्मीरवरून भारताने पाकला फटकारले
मुंबईकरांची दिशाभूल केली हे अत्यंत निंदनीय
आपण मुंबईच्या प्रथम नागरिक आहात. ही सन्मानाची बाब असली पाहिजे. पण आपण घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये ज्या पद्धतीने आपण मुंबईकरांची दिशाभूल केली हे अत्यंत निंदनीय आहे. आम्हीही समजू शकतो की ‘पेंग्विन’च्या दबावामुळे आपण खोट्याला खरं सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला, असा खोचक टोला लगावत महापालिकेने प्रकाशित केलेल्या आकडेवारीप्रमाणे पर्यटकांची संख्या २०१७ ते २०१८ या आर्थिक वर्षात १७ हजार ५७ हजार ०५९ होती. पण मागील दोन वर्षांमध्ये पर्यटकांचा आकडा कमी झाला, आता ती संख्या १० लाख ६६ हजार ०३६ वर आली आहे. त्यामुळे तीन वर्षांत सात लाख पर्यटकांची संख्या घटलेली आहे. मुळात महसूल वाढला म्हणून आकर्षण वाढले असा भ्रमीत करण्याचा प्रयत्न आपण केला, असे नितेश राणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
ही विचारधारेची लढाई, तडजोड नाही; संघ, भाजपवर राहुल गांधी यांचा हल्लाबोल
जो महसूल वाढलेला आहे, तो या वाढीव शुल्कामुळे
पण वास्तवामध्ये २०१० पर्यंत या राणीबागेतील प्रवेश शुल्क हे ५ रुपये होते. पण त्यानंतर हे शुल्क आपण ५ रूपयांवरून थेट ५० रूपयांवर नेलं. दोन प्रौढ आणि बारा वर्षाखाली दोन मुले आदींसाठी १०० रुपये आणि एका प्रौढ व्यक्तीला ५० रुपये अशाप्रकारचे अजब शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे जो महसूल वाढलेला आहे, तो या वाढीव शुल्कामुळे आहे पर्यटकांची संख्या किंवा आकर्षण वाढल्याने नाही, असा दावाही नितेश राणे यांनी केला.
Love for Penguins.. and Mumbaikar ? @BJP4Maharashtra@MCGM_BMC@MayorMumbaipic.twitter.com/vBKDAQhcJe
— nitesh rane (@NiteshNRane) September 16, 2021
पंधरा कोटीचा पेंग्विन देखभालीचा ठेका कोणासाठी?
एवढंच नाही तर शक्ती आणि करिष्मा ही वाघाची जोडीही आकर्षण असल्याचे आपण सांगितलंत. पण जर वाघाची देखभाल महापालिका कर्मचारी स्वतःकरु शकतात तर पेंग्विनची का नाही ? हा पंधरा कोटीचा पेंग्विन देखभालीचा ठेका कोणासाठी? राणीची बाग हा सामान्य मुंबईकर कुटुंबातील लहान मुलांसाठी आईवडीलांकडे हट्ट करून जाण्याचे ठिकाण होते. पण एका ‘पेंग्विन’च्या बालहट्टामुळे त्यांचे हक्काचे खेळण्याचे-विरंगुळ्याचे स्थानही आपण अव्वाच्या सव्वा तिकीट दर लावून हिरावून घेतले. इतकेच नाही तर लहान मुलांना पाहता यावं म्हणून हा पेंग्विन कक्ष बनवला. पण मुंबईतील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करताना राणीबागचे दरवाजे मुलांसाठी खुले केले गेले नाहीत, मग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय? हे तरी सांगा, असे नितेश राणे आपल्या पत्रात म्हणाले.