मुंबई: भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांना अटक होण्याची शक्यता आहे. यासाठी पोलिसांकडून मोठी फिल्डिंग लावण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला नितेश राणे यांना भोवणार असल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी नितेश राणे यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, ते गैरहजर होते. त्यामुळे आता पोलिसांनी अटकेची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. सचिन सातपुतेच्या अटकेनंतर आता शिवसेनेने भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करावी, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे पोलिसांनी तिसऱ्यांदा नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, नितेश राणे एकदाही चौकशीला आले नाहीत. पोलीस नितेश राणे यांच्या घरीही गेले होते. मात्र, नितेश राणे तेथेही उपस्थित नव्हते.
विधानभवनातून नितेश राणे यांना ताब्यात घेण्याची तयारी
मुंबईत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला नितेश राणे यांनी हजेरी लावल्यास मुंबई पोलिसांच्या मदतीने नितेश राणे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाऊ शकते, असाही कयास बांधला जात आहे. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चार्टर्ड विमानातून नितेश राणे दिल्लीला जाऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी गोवा विमानतळाशी संपर्क साधून तिथूनही अटकेची तयारी केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठोपाठ आता नितेश राणे यांनाही अटक होणार का? याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अधिवेशन काळात आमदाराला थेट अटक करता येत नाही. अटक करायची असेल तर, विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. पण, अद्यापही विधानसभा अध्यक्षांची निवड झालेली नाही. सोमवार किंवा मंगळवारी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यानंतर अध्यक्षांची परवानगी घेऊन नितेश राणेंवर अटकेची कारवाई करणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
https://fb.watch/a9065QLubf/