मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ED) केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. ईडी कारवाईविरोधात शिवसेनेसह महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) नेत्यांनी भाजपवर टीका केली असून, भाजप नेतेही संजय राऊतांवरील कारवाईवर भाष्य करताना दिसत आहेत. यातच आता भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ईडीने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांना तुरुंगात पाठवा, असे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्याशी संबंधित अलिबागमधील मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावाने अलिबागमध्ये खरेदी करण्यात आलेल्या जमिनीचे एकूण ८ प्लॉट ईडीकडून जप्त करण्यात आले असून, संजय राऊतांचा दादरमधील एक फ्लॅटही ईडीने जप्त केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी आता नितेश राणे यांनी भाष्य करत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांना लवकरात लवकर अटक करावी
संजय राऊत यांना बाहेर ठेवून उपयोग नाही, त्यांना लवकर घोड्यावर बसवून तुरुंगात पाठवा. ज्याअर्थी ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली म्हणजे तो गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे संजय राऊत यांना लवकरात लवकर अटक करावी अशी माझी मागणी आहे. भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे. तो भ्रष्टाचार संजय राऊत नावाच्या व्यक्तीने केला आहे. पैशाचा गैरवापर केला. त्यामुळे त्यांना बाहेर ठेऊन उपयोग नाही. त्यांना लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या बाजूला शिवभोजन थाळी खाण्यासाठी पाठवले पाहिजे, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. ते टीव्ही९शी बोलत होते.
दरम्यान, ईडीने केलेल्या कारवाईनंतर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. कुठली मालमत्ता? आम्ही काय मालमत्तावाले लोक आहोत का? २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर. त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही. विचारणा केली नाही. २००९ ची मालमत्ता आहे. एक एकरही पूर्ण जागा नाही. आमच्या पत्नीच्या किंवा आमच्या नात्यातील लोकांच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या त्या जागा आहेत. ईडीला आता त्याच्यात आर्थिक गैरव्यवहार दिसायला लागला. राजकीय सूड कोणत्या थराला जाऊन पोहोचलाय, ते तुम्ही पाहिले असेल. एक रुपया जरी अशा गैरव्यवहारातला आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता खरेदी केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपाला दान करायला तयार आहोत, असे थेट आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले.