मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. यातच पहिल्याच मंत्रिमंडळ बैकठीत नव्या शिंदे सरकारने मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच होण्याविषयी राज्याच्या महाधिवक्त्यांना न्यायालयात बाजू मांडण्याचे निर्देश दिले. याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आक्षेप घेतला. यावरून आता आरोप-पत्यारोप सुरू झाले असून, भाजपने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.
भाजप नेते आणि आमदारा नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मुंबई मेट्रोच्या कारशेडबाबत नव्या सरकारने दिलेल्या निर्देशावरून नाराजी व्यक्त करत, आरेमध्येच जेव्हा पुन्हा एकदा कारशेड होण्याबाबत निर्देश देण्यात आले. तेव्हा मला वाईट वाटले. आरेमध्येच कारशेड होण्याचा हट्ट धरू नका, असे आवाहन केले. यावरून नितेश राणे यांनी ट्विट करत निशाणा साधला.
चॅरिटी घरातून सुरू होते माजी मुख्यमंत्री!!
जर माजी मुख्यमंत्र्यांना मुंबई आणि पर्यावरणावर खरेच प्रेम आहे तर मग त्यांनी आपल्या पर्यावरण मंत्री असलेल्या पुत्राला का थांबवले नाही, जो पवई मध्ये सायकलिंग ट्रॅक बनवत होता आणि मरीन ड्राइव्ह येथे व्ह्यूइंग गॅलरी बनवत होता ज्याने पर्यावरणाची कायमची हानी केली आहे. चॅरिटी घरातून सुरू होते माजी मुख्यमंत्री!! ढोंगी!, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
माझ्यावर राग असला तरी चालेल. पण माझा राग मुंबईवर काढू नका. मुंबई मेट्रोची आरे कारशेड ही पर्यावरणासाठी योग्य नाही. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. ही जागा निश्चित करण्यात आली. तेव्हा एकाच रात्रीत शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली. ही कारशेड झाली तर तेथील वन्यजीव आणि वनजीवनाला मोठा धोका निर्माण होईल. आता तेथे कारशेड झाल्यास ते पुढे पुढे वाढत जाईल आणि आरेचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. पर्यावरणाच्या दृष्टिने विचार करूनच मुंबई मेट्रोची कारशेड आरेमध्ये नको, या निर्णय घेत माझ्या पहिल्या मंत्रिमंडळात यावर स्थगितील दिली होती. कांजूरमार्गची जागा अनेकार्थाने चांगली आहे. त्यामुळे कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव नाकारू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
आरेसाठी हट्ट धरू नका
आरेमध्येच जेव्हा पुन्हा एकदा कारशेड होण्याबाबत निर्देश देण्यात आले. तेव्हा मला वाईट वाटले. आरेमध्येच कारशेड होण्याचा हट्ट धरू नका, असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. तत्पूर्वी, मुंबई मेट्रोच्या आरे येथील कारशेडवरून भाजप आणि शिवसेनेत कायम संघर्ष झाल्याचे दिसून आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आरे येथे मेट्रोचे कारशेड करण्याचा निर्णय घेतला होता. तेथे कामही सुरू करण्यात आले होते. मात्र, शिवसेनेचा विरोध असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होताच आरे ऐवजी कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड होईल, असे निर्देश दिले. मात्र, या जमिनीवर केंद्र सरकारने दावा केला. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. भाजपने याला कडाडून विरोध केला होता. यानंतर आता, आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, असे निर्देश महाराष्ट्र सरकारने राज्याच्या महाधिवक्ता यांना दिले आहेत. याबाबत शासनाची बाजू न्यायालयासमोर मांडावी, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.