मुंबई : मुंबईतील राजकीय वर्चस्वावरून शिवसेना आणि भाजपा या मित्रपक्षांमध्ये चांगलीच जुंपली आहे. ज्यांना कावीळ झाली आहे त्यांना सगळं पिवळंच दिसतं, अशा शब्दांत मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रतिटोला लगावला. मुंबईत भाजपाच एक नंबरचा पक्ष असून, भविष्यातही भाजपाच क्रमांक एकचा पक्ष असेल, असा दावाही त्यांनी केला. शनिवारी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. ज्यांना आत्ताच हळद लागलीय त्यांना मुंबई महापालिकेची स्वप्ने पडू लागली आहेत. पालिकेवर झेंडा फडकाविण्याची भाषा करणाऱ्या भाजपाने आधी दिल्ली आणि बिहारमधील पराभव आठवावेत, असे सांगत मुंबईत शिवसेनेचाच आवाज घुमणार असल्याचा टोला उद्धव यांनी लगावला होता.विधानसभा निवडणुकीत व्यक्तिगत टीका करणाऱ्यांना मुंबईकरांनी जागा दाखविली आहे. उद्धव ठाकरे यांनी कितीही टीका केली तरी विधानसभेच्या निकालांनी भाजपाच नंबर वन असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. येत्या काळात भाजपा आणखी विस्तारेल आणि महापालिकेवरही भाजपाचाच झेंडा फडकेल, असे शेलार म्हणाले. विधानसभेच्या रणधुमाळीत युतीच्या नेत्यांनी एकमेकांची उणीदुणी काढली होती. आता महापालिकेच्या आखाड्यातही युतीचे नेते एकमेकांवर टीकेची झोड उठविणार हे स्पष्ट आहे.
मुंबईत भाजपाच नंबर वन - शेलार
By admin | Published: January 25, 2016 2:39 AM