Join us

Exclusive: भाजपकडून सेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदांंची ऑफर; 2 दिवसाचा अल्टिमेटम अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 1:06 AM

येत्या दोन दिवसांत काय तो प्रतिसाद द्या

यदु जोशीमुंबई : मुख्यमंत्री पद भाजपकडेच पाच वर्षे राहील, असे स्पष्ट करतानाच भाजपने आता शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदांची ऑफर दिली असून त्यावर येत्या दोन दिवसांत काय तो प्रतिसाद द्या, असा अल्टिमेटम दिला आहे. सध्या शिवसेनेचे सहा कॅबिनेट तर सात राज्यमंत्री आहेत. त्यात दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद वाढवून देत शिवसेनेला १६ मंत्रिपदे दिली जातील आणि सहा अपक्षांसह ६२ आमदार असलेल्या शिवसेनेसाठी हा तोडगा सन्मानजनकच असल्याची भूमिका भाजपतर्फे सत्तावाटपाच्या चर्चेत आज मांडली गेली. एका महत्त्वाच्या मध्यस्थामार्फत ही चर्चा सुरू आहे. या फॉर्म्युल्यानुसार १०५ अधिक १५ अपक्ष असे १२० संख्याबळ असलेल्या भाजपकडे २३ मंत्रीपदे असतील.

राज्य मंत्रिमंडळाची एकूण सदस्य संख्या नियमाप्रमाणे मुख्यमंत्र्यांसह ४३ राहू शकते. भाजपच्या ऑफरनुसार शिवसेनेला १६ मंत्रिपदे दिल्यानंतर भाजपकडे २७ मंत्रिपदे उरतात. त्यातील चार ही भाजपच्या लहान मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत. म्हणजे भाजपचे २३, शिवसेनेचे १६ आणि लहान पक्षांचे चार मंत्री होतील. सध्या शिवसेनेचे १३ (राज्यमंत्र्यांसह) मंत्री आहेत. भाजपकडून सहा ते सात मंत्रिपदे तर शिवसेनेकडून तीन मंत्रिपदे रिक्त ठेवली जातील, अशी शक्यता आहे.

दोन दिवसांचा अल्टिमेटमआम्ही देत असलेल्या ऑफरबाबत तुमचा निर्णय १ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत कळवा. अन्यथा इतर पर्यायाचा विचार करू, असा अल्टिमेटम भाजपने शिवसेनेला दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेने ऑफर स्वीकारली नाही तर विधानसभेत विरोधकांच्या सहकार्याने विश्वासदर्शक ठराव मंजूर करवून घ्यायचा. पुढील सहा महिने अविश्वास ठराव आणता येणार नाही. त्या अवधीत सत्तेचे समीकरण जुळवायचे असा भाजपचा विचार आहे.

आदित्य यांच्यासाठी आग्रहशिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री पद द्यावे, अशी आग्रही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली असल्याचे समजते. आदित्य उपमुख्यमंत्री झाल्यास दोन्ही पक्षांचा सत्तेतील समन्वय अधिक चांगला होईल, असे त्यांना वाटते.

पक्षांची रस्सीखेचशिवसेनेसोबत आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर, बच्चू कडू, राजकुमार पटेल, शंकरराव गडाख आणि मंजुळा गावित असे सहा अपक्ष आमदार आहेत. भाजपसोबत रवि राणा, राजेंद्र राऊत, संजय शिंदे, गीता जैन, राजेंद्र पाटील यड्रावकर, किशोर जोरगेवार,प्रकाश आवाडे, विनय कोरे, विनोद अग्रवाल, महेश बालदी, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षीतिज ठाकूर, राजेश पाटील असे १३ आमदार (म्हणजे एकूण ११८) आताच आहेत. उद्यापर्यंत ही संख्या १२० पर्यंत जाईल, असा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतशी बोलताना केला.ही खाती देण्याची तयारीगृह, वित्त, नगरविकास आणि महसूल यापैकी कोणतेही खाते शिवसेनेला दिले जाणार नाही. मात्र, जलसंपदा, कृषी, ग्रामविकास आणि सार्वजनिक बांधकाम यापैकी दोन खाते देण्यास भाजपने तयारी दर्शविली आहे. ती देताना सध्या शिवसेनेकडे असलेली दोन खाती भाजपकडे जातील.

टॅग्स :शिवसेनाभाजपादेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे