अयोध्येतील रामलल्ला दर्शन पूर्वतयारीसाठी मुंबईतून भाजपा पदाधिकारी रवाना
By मनोहर कुंभेजकर | Updated: January 27, 2024 21:08 IST2024-01-27T21:07:16+5:302024-01-27T21:08:42+5:30
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून रामलल्लाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वे गाड्या

अयोध्येतील रामलल्ला दर्शन पूर्वतयारीसाठी मुंबईतून भाजपा पदाधिकारी रवाना
मुंबई - संपूर्ण देशाचं श्रद्धास्थान, आराध्य दैवत असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि तेथील राम लल्ला दर्शन पूर्वतयारी आणि आगामी नियोजनासाठी माजी राज्यमंत्री, मुंबई भाजपा उपाध्यक्ष अमरजित मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतून भाजपा पदाधिकाऱ्यांचा जत्था आज अयोध्येला रवाना झाला.
माजी नगरसेवक कमलेश यादव, भाजपा नेते जितेंद्र राउत, सनी साठे, मुंबई उत्तराखंड सेल अध्यक्ष महेंद्र सिंह गोसाई , महेंद्र खेडेकर, रविशंकर दुबे,सुमनलाल उनियाल, अनिल कनौजिया आदी अयोध्येला रवाना झाले.
अमरजित मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येला पोहोचलेले हे पथक मुंबईहून रेल्वेने दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी निवास, वाहतूक, भोजन आणि रामललाच्या दर्शनाची व्यवस्था करणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून रामलल्लाच्या दर्शनासाठी विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे.
अयोध्येत दर्शनासाठी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी वेगवेगळ्या राज्यांतील भाजपा पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. दक्षिण मध्य जिल्हा भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मनोज मिश्रा यांनी उपस्थितांना भगवान श्री रामाचे चित्र आणि मिठाई देवून निरोप दिला.