नालासोपारा (मंगेश कराळे) :- आयर्नमॅन स्पर्धा विजेता हार्दिक पाटील यांच्या घरावरील पेट्रोल बॅाम्ब हल्ल्यातील भाजप पदाधिकारी कांचन ठाकूर याला विरार पोलिसांकडून बुधवारी संध्याकाळी अटक करण्यात आली आहे.
आयर्नमॅन हार्दिक पाटील याच्या निवासस्थानी ४ मे २०२१ रोजी त्यांच्या घरावर पेट्रोलचा बाँम्बचा मारा करण्यात आला होता. विरार पोलिसांनी या प्रकरणी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, कट कारस्थान रचणे या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आतापर्यंत ७ आरोपींना अटक केली असून यातील दोन आरोपी फरार आहेत.
कांचन ठाकूरला कोर्टाने अंतरिम जामीन दिला होता पण तो फेटाळल्याने या फरार आरोपीला अटक करण्याची मागणी हार्दिक पाटील यांनी पत्रकार परिषदेत काही महिन्यांपूर्वी केली होती. भारत देशाचे प्रतिनिधीत्व जगातील स्पर्धेत करत असून माझ्याच जीवाला धोका निर्माण झाला असून फरार आरोपींना पकडण्याची मागणी करावी लागणे ही शोकांतिका असल्याचे मत पाटील यांनी त्यावेळी व्यक्त केले होते. कांचन ठाकुरला गुरुवारी वसई न्यायालयात विरार पोलिसांनी हजर केल्यावर सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.