सत्तेतील भाजपाला उमेदवारांची करावी लागते पळवापळवी!, विरोधकांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 01:50 AM2019-03-24T01:50:59+5:302019-03-24T01:51:31+5:30
पाच वर्षे देशात आणि राज्यात सरकार असतानाही भाजपाला लोकसभेच्या ४८ जागांसाठी दुसऱ्या पक्षातील उमेदवारांची पळवापळवी करावी लागते.
मुंबई : पाच वर्षे देशात आणि राज्यात सरकार असतानाही भाजपाला लोकसभेच्या ४८ जागांसाठी दुसऱ्या पक्षातील उमेदवारांची पळवापळवी करावी लागते. २५ टक्के जागांवर त्यांनी काँग्रेस, राष्टÑवादीतून आयात केलेले उमेदवार दिले, जर यांनी काम चांगले केले असते तर त्यांना अशी पळवापळवीच गरजच पडली नसती, असा सणसणीत टोला संयुक्त माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. तर बालाकोटच्या हल्ल्यानंतर प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवणारे स्वत: मात्र पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शुभेच्छा संदेश देतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वागणे हे असे दुटप्पी आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.
संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या घोषणेसाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, पीआरपी, रिपब्लिकन पक्ष यांच्यासह ५६ पक्षांनी शनिवारी संयुक्त पुरोगामी महाआघाडीची स्थापना केल्याची घोषणा केली. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे नेते जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरीचे अध्यक्ष राजू शेट्टी, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, पीआरपीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, युवा स्वाभिमानचे रवी राणा यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेला सर्व ५६ पक्ष व संघटनेचे नेते उपस्थित होते.
गणराज्य संघाच्या सुषमा अंधारे, अर्जुन डांगळे, लोकतांत्रिकचे कपिल पाटील, तानसेन ननावरे, राष्ट्रीय स्वराज सेनेचे श्रीहरी बागल आदींसह ५६ पक्षांनी या महाआघाडीला पाठिंबा दिला आहे.
जागा वाटपाचे काय ठरले असे विचारले असता ते म्हणाले, ४८ जागांपैकी काँग्रेसने २६ आणि राष्टÑवादीने २२ जागा लढविण्याचा निर्णय झाला आहे. दोघांनी आपापले मित्रपक्ष त्यात सामावून घ्यायचे असे ठरले आहे. त्यानुसार राष्टÑवादीने अमरावतीची जागा युवा स्वाभिमान पक्षाच्या रवी राणा यांच्यासाठी आणि हातकणंगलेची दुसरी जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली आहे. काँग्रेसने एक जागा बहुजन विकास आघाडीसाठी दिली असून एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
रिपाई कवाडे गटाचे जोगेंद्र कवाडे, रिपाई गवई गटाचे डॉ. राजेंद्र गवई, युवा स्वाभिमान पक्षाचे आ. रवि राणा तसेच विविध कामगार संघटनांच्या वतीने कॉ. विश्वास उटगी आदी पक्षांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
‘ती’ भाजपाची टीम बी
जातीयवादी शक्तींना विरोध करण्यासाठी आम्ही काही मित्र पक्षांना ६ जागा सोडायला तयार होतो पण काहींनी त्यासाठीही नकार दिला. आज जे या महाआघाडीत आले नाहीत ती भाजपाची टीम बी आहे. बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्याचे पातक करण्यासाठी भाजपा आघाडीवर असताना त्यांनाच मदत होईल अशी कृती काही लोक बाबासाहेबांचे नाव घेऊन करत आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता अजित पवार यांनी केली. भाजपाने सत्तेतून पैसा, पैशांतून सत्ता हेच ध्येय ठेवल्याचे, ते म्हणाले.
हे तर लुच्च्या लोकांचे सरकार : अच्छे दिनाचे गाजर दाखवणाºया लुच्च्या लोकांचे हे सरकार आहे. आता तर या सरकारने मंडल आयोगाच्या धोरणाचा फेरविचार करण्याचा निर्णय घेतला आहे. जाती जातीत तेढ निर्माण करुन ती आणखी वाढवण्याचा हा कट आहे. या सरकारने घटनात्मक संस्थाही धोक्यात आणल्या आहेत. शेतकरी, कामगार, सर्वसामान्यांना फसवण्याचे काम भाजपाने केले आहे म्हणून आपण महाआघाडीत सहभागी झालो आहोत, असे खा. शेट्टी म्हणाले.
राधाकृष्ण विखेंनी फिरवली पाठ
विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची गैरहजेरी चर्चेचा विषय झाली. त्यांचे प्रसिद्धीप्रमुख अभिजीत देशमुख यांनी विखे यांना हेलिकॉप्टर मिळाले नाही म्हणून ते आले नाहीत, असे सांगितले. विखे मुलाचा प्रचार करत असतील तर त्याची माहिती घेतली जाईल, असे चव्हाण म्हणाले.
मतांचे विभाजन नको म्हणून आघाडी
शेतकरी कामगार पक्षाने आघाडीत २ जागा मागितल्या होत्या. मात्र मतांचे विभाजन होऊ नये म्हणून आम्ही एकही जागा न लढवता महाआघाडीत सहभागी झालो आहोत. आमची दोन मतदारसंघात निर्णायक मते आहेत. मात्र संविधान जपण्यासाठी महाआघाडीला आमचा पाठिंबा आहे, असे आ. जयंत पाटील म्हणाले.
बाबासाहेबांच्या विचारांना धक्का देणाऱ्यांना धक्का द्या!
आम्ही आघाडीकडे दोन जागा मागितल्या होत्या. मात्र सध्याचे मनुवादी सरकार हद्दपार करण्यासाठी आम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता महाआघाडीत सहभागी झालो आहोत. बाबासाहेबांच्या विचारांना धक्का देणाºयांना धक्का द्या, असे जोगेंद्र कवाडे म्हणाले.
ती क्लिप मी ऐकलेली नाही - अशोक चव्हाण
माझेच पक्षात कोणी ऐकत नाही, मीच राजीनामा देण्याच्या विचारात आहे, असे उद्गार असणारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यावर ते म्हणाले, ती क्लिप मी ऐकलेली नाही, त्यामुळे त्यावर मी काहीही बोलणार नाही. चंद्रपूरहून विनायक बांगडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. ही उमेदवारी मुकूल वासनिक यांच्या शिफारशीवरून देण्यात आली, असे बोलले जाते. मात्र त्यासाठी शिवसेनेचे विद्यमान आ. बाळू धानोरकर यांनी स्वत:च्या आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना उमेदवारी दिली गेली नाही.
चंद्रपूरहून राजूरकर नावाच्या कार्यकर्त्याने अशोक चव्हाण यांना फोन केला. तेव्हा, मी तुमच्याशी १०० टक्के सहमत आहे, तुम्ही मुकूल वासनिक यांच्याशी बोलून घ्या, माझे येथे कोणी ऐकायला तयार नाही, मी सुद्धा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे, असे खा. चव्हाण म्हटल्याचा क्लिपमध्ये उल्लेख आहे.
त्यावर चव्हाण म्हणाले, पक्षाचा कार्यकर्ता जर थेट प्रदेशाध्यक्षांना बोलून मन मोकळं करत असेल तर त्याचे म्हणणे ऐकून घ्यायचे की नाही. त्याला दिलासा देण्याचे काम केले, शिवाय दोघांमधला हा खासगी संवाद सार्वत्रिक कसा होऊ शकतो?