“राज ठाकरे मला निश्चित सहकार्य करतील”; प्रसाद लाड यांनी शिवतीर्थावर घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 06:08 PM2022-06-13T18:08:02+5:302022-06-13T18:08:58+5:30
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवार प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांची घेतलेली भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.
मुंबई: राज्यसभेची रणधुमाळी शमते ना शमते तोच आता विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election 2022) निवडणुकीसाठी राजकारण तापताना दिसत आहे. राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या स्मार्ट खेळीमुळे भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांचा दणदणीत विजय झाला. यानंतर आता अवघ्या काही दिवसांवर विधान परिषद निवडणूक आली आहे. महाविकास आघाडीसह भाजपनेही पुन्हा एकदा कंबर कसली आहे. यातच भाजपकडून उमेदवारी मिळालेले प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. यावेळी, राज ठाकरे मला निश्चित सहकार्य करतील, असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.
राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतल्यानंतर प्रसाद लाड प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज ठाकरे आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. त्यांचा वाढदिवसही आहे, वाढदिवशी ते कोणालाही भेटणार नाही, असे त्यांनी आधीच जाहीर केले आहे. म्हणूनच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे मला निश्चित सहकार्य करतील
राज ठाकरे यांचे मत मिळण्याविषयी काही चर्चा झाली का, असा प्रश्न विचारला असता, मैत्रीमध्ये चर्चा न झालेली चांगली असते. निश्चितपणे राज ठाकरे मला सहकार्य करतील याची मला खात्री आहे, असे सूचक विधान प्रसाद लाड यांनी केले. तसेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील लोक देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करतील आणि त्यानंतर जर काही पर्याय निघेल तर त्याबाबत मला माहिती नाही. सर्व जागा जिंकण्याची ताकद भाजपकडे आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर ती ताकद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे, असे प्रसाद लाड यांनी नमूद केले.
दरम्यान, सरकार अल्पमतात येईल इतकी मते भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर आमदारांमध्ये असलेली अस्वस्थता, सर्व अपक्ष आणि छोट्या पक्षाचा देवेंद्र फडणवीसांवरचा असलेला विश्वास निश्चितपणे या सरकारला अल्पमतात आणण्याइतके मतदान भाजप मिळेल, असा दावा प्रसाद लाड यांनी केला.