मुंबई - अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात राज्यात सर्व जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सरकारने मद्यालये, हॉटेल, दुकाने, एसटी बसेस सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल या भीतीने अद्यापही राज्यातील मंदिरे कुलुपबंद आहे. राज्यातील मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरांसह धार्मिक संस्था उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. मुंबईमध्ये देखील सिद्धीविनायक मंदिरासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड सहभागी झाले होते.
"काहीही झालं तरी आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करणार" अशी भूमिका घेणाऱ्या भाजपाच्या काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. याच दरम्यान एका पत्रकाराने प्रसाद लाड यांना तोंडावरील मास्क निघाल्याचे लक्षात आणून दिले. यानंतर लाड यांनी महानगरपालिकेमध्ये जाऊन मास्क नीट न लावल्याबद्दल दंड भरला. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी याबाबबत दिली आहे. मात्र ही माहिती देताना त्यांनी दिलेल्या हिंदी कॅप्शनवरुन ते सध्या जोरदार ट्रोल होत आहेत.
प्रसाद लाड यांनी "गलती को माफी नहीं , हम कोई भी हो न्याय व्यवस्था सबसे बडी है ... आंदोलन मे पोलीस कि दडपशाही कारण मेरा मुह: का मास्क निच्ये आया मुझे ये बात झी न्यूज ने नजर में लाई मैने मेरी गळती कि माफी मांगते हुवे खुद्द महानगर पालिका कार्यालय जाके खुद जुर्माना भर दिया.." असं हिंदीमध्ये ट्विट केलं आहे. मास्क न लावल्याबद्दल 200 रुपये दंड भरल्याच्या पावतीचा फोटो देखील ट्विट केला आहे. मात्र कॅप्शनमध्ये मास्क निचे ऐवजी "निच्ये" आणि गलती ऐवजी "गळती" अशा शब्द टाईप झाला आहे. यावरुनच आता त्यांना हिंदी भाषेच्या वापरासाठी ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नेटकऱ्यांनी प्रसाड लाड यांची ही 'गळती' ओळखली असून याचसाठी पावती फाडायला हवी होती असं म्हटलं आहे.
प्रसाद लाड यांची "गळती" से मिस्टेक; हिंदीवरून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...