मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभरात तीव्र आंदोलन सुरू आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांची संप पुकारला आहे. मात्र, उच्च न्यायालयाने या प्रकरणी न्यायालयीन अवमानाबाबत एसटीच्या आंदोलन करणाऱ्या युनियनला नोटीस बजावली आहे. मात्र, भाजप एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत असून, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी भावनिक बोलून एसटी कर्मचारी यांचा प्रश्न सुटणार नाही. अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिली आहे, अशी घणाघाती टीका दरेकर यांनी केली आहे.
राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांवर जुलमी स्वरुपाची कारवाई सुरू आहे. एसटी बंद करुन खाजगी बसेस सुरु करत आहेत. यातून काही मलिदा लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे का? एका बाजूला एसटी बंद ठेवायची आणि दुसरीकडे खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन द्यायचे, हे चुकीचे आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
एसटी महामंडळ हे देशातील सर्वात मोठे महामंडळ
भाजपला एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कुणाची पोळी भाजण्याची गरज नाही. कोणतीही इच्छा असेल तर सर्व काही करता येईल. महाराष्ट्रातील एसटी महामंडळ हे देशातील सर्वात मोठे महामंडळ आहे. त्यात काही लिकेजस आहेत. ते व्यवस्थित केले तर सर्व काही व्यवस्थित करता येईल, असे दरेकर यांनी सांगितले. दुसरीकडे, नवाब मलिक यांच्यावर अनेक दावे पडलेले आहेत. ज्यांना अब्रुच नाही त्यांच्या अब्रू नुकसानी संदर्भात काय बोलायचे, असा टोला दरेकर यांनी यावेळी बोलताना लगावला.
दरम्यान, राज्य सरकारने आतापर्यंत ९१८ हून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तरीही संप मागे घेण्यास कर्मचारी तयार नाहीत. आता या आंदोलनाची धग मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पोहचली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत राज ठाकरेंनी सुरुवातीला शिष्टमंडळाला मी आत्महत्या करणाऱ्यांचे नेतृत्व करत नाही. आधी आत्महत्या थांबवा, ही माझी अट आहे असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.