Join us

“राज्यात अराजक सदृश्यस्थिती, एका सेकंदात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे”; भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 1:25 PM

सत्तेचा उन्माद आणि सत्तेचा वापर करुन राज्यात अशी गुंडगिरी कधीच झाली नाही, अशी टीका भाजपने केली आहे.

मुंबई: राज्यात एकामागून एक घडत असलेल्या घटनांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेली भूमिका, ठाकरे सरकारला दिलेले अल्टिमेटम आणि विरोधकांनी राज यांच्यावर सोडलेले टीकास्त्र सुरू असतानाच आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाचा निर्धार बोलून दाखवला. यामुळे शिवसैनिक चांगेलच आक्रमक झाले आहेत. यावरून भाजपने महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली असून, राज्यात अराजक सदृश्यस्थिती निर्माण झाली असून, एका सेकंदात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, असे म्हटले आहे. 

भाजपच्या सर्व आमदारांनी मिळून पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच मोहित कंबोज यांच्याबाबत शुक्रवारी रात्री झालेल्या प्रकरणावरून सरकारचा समाचार घेतला. मोहित कंबोज रस्त्यावरुन जात असताना त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. नवनीत राणा यांच्या घरापर्यंत कार्यकर्त्यांना जाण्याची मुभा दिली. राज्यात गुंडगिरी सुरु असून, ही सरकार पुरस्कृत गुंडगिरी असल्याचा आरोप दरेकर यांनी यावेळी केला. 

एका सेकंदात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे

ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, त्याच पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांच्या समोर गुंडगिरी करत आहेत. महाराष्ट्रात पोलिसांच्या समोर एवढी दहशत कधीच झाली नव्हती. या गुंडगिरीचे समर्थन शिवसेनेचे नेते करत आहेत. असा प्रकारचे समर्थन करणार असाल तर समोरचे कार्यकर्ते हातबांधून बसणार नाहीत. सध्या राज्यात अराजक सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. असे राज्यात कधीच झाले नव्हते. अलीकडील काळातील जर सर्व कृत्य पाहिली तर एका सेकंदात राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, अशी स्थिती आहे, या शब्दांत प्रवीण दरेकर यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, शिवसेनेचे कार्यकर्ते दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम या महाविकास आघाडीच्या सरकारने केले आहे. आता नाकातोंडात पाणी जात आहे. सत्ता येत असते जात असते. पण सत्तेचा उन्माद आणि सत्तेचा वापर करुन राज्यात अशी गुंडगिरी कधीच झाली नाही. हे वेळीच थांबले नाहीतर एका बाजूने हल्ला केला तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा प्रतिहल्ला होईल, असा इशारा दरेकर यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री याबाबत का हस्तक्षेप करत नाहीत, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :महाविकास आघाडीराजकारणभाजपाप्रवीण दरेकर