Pravin Darekar on Kirit Somaiya: “नाहीतर तिथेच किरीट सोमय्यांची हत्या झाली असती”; प्रवीण दरेकरांचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 04:47 PM2022-04-27T16:47:57+5:302022-04-27T16:49:15+5:30
Pravin Darekar on Kirit Somaiya: किरीट सोमय्या सरकारचे घोटाळे, भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत, त्यामुळे त्यांनाच नष्ट करावे, असा कट सरकारचा असल्याचा मोठा दावा प्रवीण दरेकर यांनी केला.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापलेले पाहायला मिळत आहे. नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचा केलेला एल्गार, संतप्त शिवसैनिकांचे मुंबईत शक्तिप्रदर्शन, राणा दाम्पत्याने आंदोलन मागे घेणे आणि त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या वाहनावर झालेला हल्ला यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा कलह होताना दिसत आहे. यातच आता भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन किरीट सोमय्यांवरील (Kirit Somaiya) हल्लाप्रकरणी निवेदन दिले आहे. यानंतर बोलताना भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर मोठा आरोप केला आहे. सीआयएसएफचे जवान होते म्हणून किरीट सोमय्यांचा जीव वाचला. नाहीतर त्याच ठिकाणी त्यांची हत्या झाली असती, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर प्रवीण दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. किरीट सोमय्या या सरकारचे घोटाळे, भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत, त्यामुळे सोमय्या यांनाच नष्ट करावे, अशा प्रकारचा कट या सरकारचा आहे. सीआयएसएफ होतं म्हणून किरीट सोमय्यांचा जीव वाचला. नाहीतर त्याच ठिकाणी त्यांची हत्या झाली असती. संविधानाने आमच्या पालकत्वाची जबाबदारी ज्यांच्याकडे दिलेली आहे. त्या राज्यपालांकडे आम्ही न्यायाच्या अपेक्षेने गेलो होतो. यासंदर्भात कठोर कारवाई करा, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.
ठाकरे सरकार मुंबई पोलिसांवर दबाव आणतेय
सरकारच्या माध्यमातून मुंबई पोलिसांवर दबाव आणला जात आहे. पोलिसांमार्फत दहशतवाद करवला जात आहे. याबाबत सर्व घटनाक्रम किरीट सोमय्यांनी राज्यपालांना सांगितला. चुकीचा एफआयआर नोंदवला गेला, त्याचा निषेध केला गेला. तो एफआयआर मागे घ्यावा ही मागणी केली, असे दरेकर यांनी म्हटले आहे. तसेच किरीट सोमय्यांच्या कारवर ६० ते ७० गुंडांच्या जमावाने हल्ला केला. मात्र सोमय्यांच्याच ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्हीत सगळे दिसत आहे. दबाव वाढल्यावर नावाला माजी विश्वनाथ महाडेश्वर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमय्यांनी पोलिस स्टेशनला कळवले होते. पोलिसांची जबाबदारी सोमय्यांना सुरक्षित बाहेर काढण्याची होती. या सर्व गोष्टी मुंबई पोलिस आयुक्ताच्या दबावाखाली होत होत्या, हे सोमय्यांनी त्या ठिकाणी पाहिले. या सगळ्या गोष्टी लोकशाहीला घातक आहेत, या शब्दांत दरेकर यांनी घणाघात केला.
दरम्यान, किरीट सोमय्यांना झेड सेक्युरीटी आहे. त्यांच्यावर जर हल्ला होत असेल तर सर्वसामान्यांनी काय करायचे. उलट आयुक्त असे म्हणतात की, सीआयएसएफ त्यावेळी काय करत होते. त्यांची अपेक्षा होती का की, सीआयएसएफने गोळीबार करावा. महाराष्ट्र पोलीस आणि सीआयएसएफमध्ये तुंबळ युद्ध व्हावे. जबाबदार आयुक्तांनी असे बेजबाबदार वक्तव्य करणे योग्य नाही. हे महाराष्ट्राला शोभनीय नाही. आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांकडे, गृहसचिवांकडे गेलो असतो पण हे सरकार आम्हाला न्याय देईल असे वाटत नाही. सरकार सुडाने पेटलेले आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.