“राऊतांना ग्रामपंचायतच्या प्रचाराला बोलावत नाही, फडणवीसांवर बोलू नये”; भाजप नेत्याची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 02:32 PM2023-11-18T14:32:12+5:302023-11-18T14:35:38+5:30
BJP Vs Sanjay Raut: संजय राऊत कोत्या मनोवृत्तीचे आहेत. संस्काराचा अभाव आहे, असा पलटवार भाजप नेत्याने केला आहे.
BJP Vs Sanjay Raut:संजय राऊत यांना साधे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणी आता बोलवत नाही. देवेंद्र फडणवीस स्टार प्रचारक आहेत. म्हणून त्यांना राष्ट्रीय नेते म्हणून सर्वत्र जावे लागते. देवेंद्र फडणवीस बाहेर जाऊन प्रचार करतात तर संजय राऊत यांना पोटशूळ का उठतोय? संजय राऊत कोत्या मनोवृत्तीचे आहेत. त्यांच्यामध्ये संस्काराचा अभाव आहे, या शब्दांत भाजप नेत्याकडून संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीपूर्वी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांसाठी प्रचाराला वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगड, मध्य प्रदेश यांसह अन्य राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. यावरून राज्यातील विरोधकांनी टीका केली होती. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात थांबायला वेळ आहे का? ते इतर राज्यातील प्रचारात असतील तर राज्यातील प्रश्नांचं काय? त्याकडे कोण लक्ष देणार? अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. याला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सदर शब्दांत उत्तर दिले.
कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही
लोअर परळ पूल उद्घाटन प्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी तशी तक्रार दाखल केली. यावरही प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जे करतात, ती दडपशाही आहे. कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तुम्ही जर कायदाच मानणार नसाल कायदा हातात घेऊन वातावरण खराब करण्याचे काम करत असाल त्यानुसार कारवाई होते. त्यामुळे ही कारवाई योग्य आहे. जर हे असे वागायला लागले तर इतरही लोक तेच करतील. लोकांचे धाडस वाढेल आणि वातावरण खराब होईल, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ओबीसी नेते एक झाले आहेत. पण कुणीही त्या समाजाचे पालकत्व घेतल्यासारखी भाषा करू नये. मग छगन भुजबळ असू दे किंवा जरांगे पाटील असू दे. समाजांमध्ये वाद निर्माण करण्याचे काम कोणी करू नये. अराजकता माजवू नये. गर्दी जमते म्हणजे त्या समाजाचे तुम्ही मालक नाहीत. अन्यथा अशा मेळाव्यात ऊपस्थित राहायचं की नाही याचा समाजही विचार करेल, असे सूचक विधान प्रवीण दरेकरांनी केले.