मुंबई: आताच्या घडीला राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Vidhan Parishad Election 2022) राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. महाविकास आघाडी असो वा भाजप दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी केली आहे. राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला असला, तरी या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. विधान परिषद निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यातच आता भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी यासंदर्भात बोलताना, विधान परिषदेची निवडणूक निश्चित कठीण आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली भाजप ताकदीने विजय संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
ज्याअर्थी पाचवा उमेदवार दिला आहे, त्याअर्थी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांची रणनीति आपण राज्यसभा निवडणुकीच्या वेळेस बघितली. आताचा विजय निश्चित कठीण आहे, परंतु आम्हाला पूर्ण विश्वास आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हा विजय आम्ही ताकदीने संपादित करू, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. तसेच यावेळी बोलताना प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.
कधी काळी शिवसेना हा संरक्षण देणारा, बेधडक पक्ष होता
कधी काळी शिवसेना हा संरक्षण देणारा, बेधडक पक्ष होता. परंतु ज्या पद्धतीने आमदारांना अचानक बोलवणे, त्यांना डांबून ठेवणे, त्यांच्यावर अविश्वास, संशय व्यक्त करणे हे कधी झाले नव्हते. त्यामुळे शिवसेनेचा जो बाज आहे त्याला धक्का पोहोचवणाऱ्या या सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत, अशा शब्दांत प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच रणांगणात उतरलेला प्रत्येक उमेदवार हा मीच निवडून येणार असे बोलत असतो. त्याप्रमाणे सर्व पक्ष या ठिकाणी अशाच प्रकारचे वक्तव्य करताना दिसत आहेत, असेही दरेकर म्हणाले.
महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचे प्रतिबिंब निवडणुकीत उमटेल
तथापि निवडणुक ही असणारी परिस्थिती, रणनीति आणि विश्वास यावर लढवली जाते. दोन-अडीच वर्षांच्या कालावधीत हे सरकार कुठल्याही प्रकारे जनतेचा विश्वास संपादन करू शकले नाही, त्यामुळे प्रचंड असंतोष, नाराजी सरकारच्या विरोधात आहे. शेवटी जे आमदार मतदान करणार आहेत ते ३ लाख जनतेचे प्रतिनिधित्व करतात आणि स्वाभाविक जनतेच्या मनामध्ये जे काही असते त्याचे प्रतिबिंब आमदारांच्या कृतीतून उमटत असते. ज्या अपक्षांच्या जीवावर तुम्ही सत्तेत आहात त्या अपक्षांनाही आपण समाधान देऊ शकला नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राला भविष्यात कोण योग्य दिशा देऊ शकतो अशा एका वेगळ्या अर्थाने ही निवडणुक होत आहे. विधान परिषदेपेक्षा महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचे प्रतिबिंब या निवडणुकीत उमटणार आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मतांची आवश्यकता आहे. राज्यसभेप्रमाणे मतदान झाले तर भाजपकडे १२३ संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपच्या ४ जागा सहज निवडून येऊ शकतात. पाचव्या उमेदवारासाठी भाजपला १२ मते कमी पडतात. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे १६१ संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार विधानपरिषदेत जातील. तसेच मित्र पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेसच्या वाट्यालाही दोन जागा येऊ शकतात.