Join us

Maratha Reservation: “ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी अन् पुन्हा आरक्षण मिळवून द्यावे”: प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 7:48 PM

ठाकरे सरकार आणि शरद पवारांसारखे आघाडीचे प्रमुख नेते मराठा आरक्षण या विषयावर आता बोलतही नाहीत, असे प्रवीण दरेकरांनी म्हटले आहे.

मुंबई: भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. मुंबईत भाजप मुख्यालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी आणि पुन्हा आरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी केली आहे. 

ठाकरे सरकारने केलेल्या गंभीर चुका आणि बेफिकीरीमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले. या सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्वप्रथम मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. नंतर ते रद्द केले. त्यानंतर ठाकरे सरकारने मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केलेले नाहीत. या सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकेसाठी पाठपुरावा केलेला नाही किंवा न्यायाधीश भोसले समितीने केलेल्या शिफारशींनुसार पावले टाकलेली नाहीत, असे दरेकर यांनी सांगितले.

मराठा आरक्षण हा विषयच विसरून गेल्यासारखी स्थिती 

हे सरकार मराठा आरक्षण हा विषयच विसरून गेल्यासारखी स्थिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असेच या सरकारचे धोरण दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा युती सरकारने कायदा करून मराठा समाजाला सरकारी नोकरी व शिक्षणात आरक्षण दिले. त्यामुळे मराठा समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवले. हे सरकार असेपर्यंत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती आली नव्हती, असे दरेकर म्हणाले. 

शरद पवार मराठा आरक्षणावर बोलतही नाहीत

केंद्र सरकारने घटनादुरस्ती करून खुलासा केल्यामुळे राज्याला मराठा आरक्षणाचे पूर्ण अधिकार आहेत. फडणवीस सरकारने जसा पुढाकार घेतला तसाच पुढाकार घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाकरे सरकारने पावले टाकायला हवीत. पण हे सरकार आणि शरद पवारांसारखे आघाडीचे प्रमुख नेते मराठा आरक्षण या विषयावर आता बोलतही नाहीत, अशी टीका दरेकरांनी केली. 

टॅग्स :मराठा आरक्षणमहाविकास आघाडीप्रवीण दरेकर