मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपही तीव्र झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रिक्षावाला सुस्साट होता, असा टोला लगावल्यानंतर लगेचच, रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला, असा पलटवार केला. यानंतर आता भाजपनेही यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मर्सिडीज संस्कृतीमुळेच शिवसेनेचा घात झाला, अशी टीका भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली.
शिवसेनेतील आमदारांनी उठावच केला आहे. आम्हीही त्याला बंड मानत नाही. कारण त्यांनी शिवसेना सोडलेली नाही. मात्र, शिवसेनेचे स्वरुप बदलले आहे. संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला पक्ष बांधून ठेवला आहे. म्हणूनच असंतोष वाढला. म्हणूनच बंडखोर आमदारांनी संजय राऊतांबद्दल केलेली वक्तव्ये ही वस्तुस्थिती आहे. संजय राऊत यांचे मिशन हे शरद पवार यांना सोबत घेऊन शिवसेना संपवण्याचा डाव होता का, अशी शंका प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मर्सिडीज संस्कृतीमुळेच शिवसेनेचा घात
राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेले पत्र योग्य आहे. भाजपच्या उमेदवार आदिवासी महिला आहेत. त्यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देणे ही मोठी गोष्ट आहे. सर्वांनी त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन प्रवीण दरेकर यांनी केले. तसेच शिवसेना ही रस्त्यावर कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे मोठी झाली. त्यात कोण रिक्षावाला होता, पान-टपरीवाला होता. बाळासाहेब ठाकरे यांनी छोट्यातील छोट्या माणसाला जाती-पातीच्या पलीकडे जाऊन मोठे केले. मात्र, यानंतर मर्सिडीज संस्कृती आली आणि याच संस्कृतीने शिवसेनेचा घात केला, असे टीकास्त्र प्रवीण दरेकर यांनी सोडले.
दरम्यान, हा नियतीचा खेळ आहे. बाळासाहेबांचा मूळ कार्यकर्ता रिक्षावाला, पान-टपरीवाला मुख्यमंत्री, मंत्री झाला. एवढे मोठे बंड होऊनही ते आपल्या अय्याशी संस्कृतीत वावरत असतील, तर ते मोठे दुर्दैव आहे. या राज्यात मर्सिडीजपेक्षा रिक्षाला जास्त महत्त्व आहे, याचे भान नसल्यामुळे ही अशा प्रकारची परिस्थिती आली आहे, अशी घणाघाती टीका दरेकर यांनी केली.