Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचे पहिले अधिवेशन आहे. मात्र, या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. तत्पूर्वी, भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटवरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता असून, त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली आहे.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी, लवकरच पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा भांडाफोड करणार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटायला जाईल, असा इशारा कंबोज यांनी ट्विटमधून दिला. तसेच २०१९ मध्ये परमबीर सिंग यांनी सिंचन घोटाळ्याची बंद कलेली चौकशी पुन्हा सुरु करण्याची मागणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. एकीकडे राष्ट्रवादी आक्रमक झाली असताना भाजप नेत्यांनी मात्र मोहित कंबोज यांची बाजू सावरत त्यांना समर्थन दिले आहे.
एवढं झोंबण्याचे काही कारण नाही
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मोहित कंबोज यांची बाजू घेतली आहे. प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि जर एक नागरिक म्हणून मोहित कंबोज यांनी ट्विट केले असेल तर एवढे झोंबण्याचे काही कारण नाही. जर आपण निष्कलंक असू तर अशा प्रकारचे ट्वीट केले तरी ते गांर्भीयाने घेण्याचे काही कारण नसावे, असे टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. तसेच गेल्या महिन्याभराच्या कालावधीत शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील जनतेला सुख आणि समाधान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे अनेक निर्णयांवरुन दिसून आले. त्यामुळे आज या अधिवेशनाकडे महाराष्ट्रातील जनता अत्यंत विश्वासाने पाहत आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.
दरम्यान, मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट १०० टक्के आहे. पुराव्याशिवाय ते बोलत नाहीत. पूर्ण पुराव्यांनिशी ते बोलतात. आजपर्यंत त्यांनी पुराव्यांच्या आधारेच भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडलेत. त्यांचं ट्विट अधिक महत्त्वाचे आहे. कोणाला तुरुंगात टाकण्याविषयी सार्वजनिक ठिकाणी बोलणं टाळायला हवं. पण कंबोज यांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी तेच केले आहे असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.