आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू, अमित शहा यांनी बोलावली बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 02:16 PM2019-06-09T14:16:36+5:302019-06-09T14:23:25+5:30
लोकसभा निवडणुकीत भाजपाने राज्यात घवघवीत यश मिळवल्यानंतर आता आगामी विधानसभेत भाजपाला घवघवीत यश मिळण्यासाठी भाजपाने आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे.
मनोहर कुंभेजकर
मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपाने राज्यात घवघवीत यश मिळवल्यानंतर आता आगामी विधानसभेत भाजपाला घवघवीत यश मिळण्यासाठी भाजपाने आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणाला भाजपा व शिवसेना युती तुटली. या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारून भाजपाचे 123 आमदार विजयी झाले होते. त्यामुळे यापेक्षा जास्त आमदार निवडणून येण्यासाठी भाजपाने आतापासूनच आगामी विधानसभेची तयारी सुरू केल्याचे समजते.त्यामुळे आजच्या अमित शहा यांनी बोलावलेल्या बैठकीला विशेष महत्त्व आहे. आगामी विधानसभेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिल्लीत भाजपाच्या केंद्रीय कार्यालयात महत्त्वाची बैठक बोलावली असल्याचे समजते.
या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस व आमदार अतुल भातखळकर, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंग ठाकूर, प्रदेश सरचिटणीस व आमदार सुरेश हळदणकर आदी मान्यवर या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.
अमित शहा यांनी बोलावली राज्यस्तरीय नेत्यांची बैठक, पक्षनेतृत्वातील फेरबदलाबाबत चर्चा होणार?
लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भाजपाध्यक्षअमित शहा यांनी केंद्र सरकारमध्ये गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. भाजपामध्ये एक व्यक्ती एक पद असे धोरण अवलंबले जात असल्याने मंत्रिपद मिळाल्यानंतर अमित शहा हे भाजपाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच अमित शहा हे आपला उत्तराधिकारी म्हणून कुणाची निवड करतात, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी 13 आणि 14 जूनदरम्यान विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रमुख नेत्यांची बैठक दिल्ली येथे बोलावली आहे. या बैठकीत पक्षसंघटनेमधील निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे.
13 आणि 14 जून रोजी होणाऱ्या बैठकीसाठी भाजपाच्या सर्व संघटन मंत्र्यांना बोलावण्यात आले आहे. पक्षसंघटनेतील निवडणुका ह्या सर्व राज्यातील संघटनांमध्ये होणार आहेत. मात्र काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणाऱ्या हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यात पक्ष संघटनेच्या निवडणुका टाळण्यात येण्याची शक्यता आहे. भाजपाच्या राज्य संघटनांच्या निवडणुका ह्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीपूर्वी होतात.