- मनोहर कुंभेजकर
मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे शिवसेना स्वबळावर निवडणूका लढवणार असल्याची घोषणा त्यांनी अलिकडेच वरळी येथील शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखिल शिवसेनेच्या या निर्णयाला जोरदार प्रतिउत्तर म्हणून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या अलिकडेच झालेल्या बैठकीत निवडणुकीच्या तयारीला लागा असे आवाहन केले होते. त्यामुळे आतापासूनच भाजपाने देखिल आगामी लोकसभा निवडणूका स्वबळावर लढण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेकडे आहे. 2014 च्या निवडणुकीत त्यावेळी शिवसेना आणि भाजपात युती होती. मोदी लाटेत विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हे 1,83000 मतांनी विजयी झाले होते. जर 2019 मध्ये शिवसेना व भाजपा मध्ये जर युती झाली नाही तर भाजपाला उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवार देखिल उभा करावा लागेल.त्यामुळेच भाजपाने आगामी निवडणुकीची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टीवासियांसाठी घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र. ५२ च्या वतीने नगरसेविका प्रीती सातम यांनी गोरेगाव पूर्व आरे मिल्क कॉलनी, युनिट क्र. ०५, मार्केट जवळील मैदानात जाहिर सभेचे आयोजन नुकतेच केले होते.विशेष म्हणजे गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचा जोगेश्वरी(पूर्व)विधानसभा मतदार संघ.आणि भाजपाने येथे झोपडपट्टीधार कांसाठी जाहिर सभेचे आयोजन करून जोरदार शक्ति प्रदर्शन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई शहरातील झाेपडपट्टी वासियांसाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले असून २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्प केला आहे, या सर्वांची जनतेला माहिती देण्यासाठी सभेच आयोजन करण्यात आले होते.मुंबई भाजपचे अध्यक्ष व आमदार आशिष शेलार हे स्वत: विविध ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या २०११ साला पर्यंतच्या झोपडपट्टीना संरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सभा घेत आहेत.
यावेळी आमदार आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने मुंबईतील २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण मिळण्यासंबंधीचे महत्त्वपूर्ण विधेयक मंजूर केल आहे. २००० सालापर्यंतच्या झोपड्यांना यापूर्वीच कायद्याने संरक्षण मिळाले. गेल्या 15-16 वर्षात मुंबईत नोकरीनिमित्त आलेले हजारो लोक आजही अनधिकृत झोपड्यांमध्ये वास्तव्य करतात त्यांना २०११ साला पर्यंतच्या झोपडीधारकांना घरकूल दिले जाणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
मुंबईत एसआरएच्या योजना होत नाहीत, कारण ३० टक्केच पात्र रहिवाशी अनेक ठिकाणी आहेत त्यामुळे २०११ पर्यंतच्या झोपड्यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर दिले जाईल. तसेच जिथे शक्य असेल तिथल्या एसआरए प्रकल्पात त्यांना घर दिलं जाण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. २०११ पर्यंतच्या झोपडपट्यांना संरक्षण देण्याबाबत आरे कॉलनीतील नागरिकांसह आदिवासी बांधवांना सविस्तर माहिती दिली. आमदार- भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष अमित साटम, नगरसेविका प्रीती सातम, नगरसेवक पंकज यादव, भूपेंद्र शिरोड़कर, उपस्थित होते. या जाहिर सभेला पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.