भारत जिंकला म्हणून आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव, BJP च्या मागणीवरून विरोधकांचा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 02:04 PM2024-07-01T14:04:53+5:302024-07-01T14:16:31+5:30
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताच्या विजयानंतर विधानपरिषदेत भाजप आमदार आशिष शेलार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घातला.
India T20 World Cup : भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा भारतीय संघाने सात धावांनी पराभव केला. बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारताच्या विजयानंतर देशभरात आनंदाचे वातावरण आहे. भारतीयांनी या विजयाचे रस्त्यावर उतरून जंगी सेलीब्रेशन केले. राज्यातल्या राजकीय नेत्यांनीही भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. मात्र आता भारतीय संघाचे अभिनंदन करण्यावरुन सोमवारी विधानपरिषदेत मोठा गदारोळ झाला.
विधानपरिषदेत विरोधी पक्षाने सभात्याग करुन सभापती निलम गोऱ्हे यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी भारतीय संघाच्या विजयानंतर क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांचा अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दावने यांनी म्हटलं. भाजपने याविषयी मागणी केल्याने विरोधी पक्षाने कशाला अभिनंदन केले पाहिजा असा सवाल केला. मात्र सभापतींनी बोलून न दिल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.
"विधानपरिषदेच्या सभापती पक्षपातीपणे वागत आहेत. विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू देत नाही. सत्ताधारी पक्षाचे लोक काही बोलतात. भारताने विश्वकप जिंकला त्यामुळे ११ खेळाडूंचे अभिनंदन करण्याऐवजी भाजपने क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे कोषाध्यक्ष शेलार यांचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मांडला. अभिनंदन खेळाडूंचे व्हायला पाहिजे. खेळाडू परिश्रम करतात, रक्ताचे पाणी करतात आणि देशाचे नाव उंचावतात. त्यांचे अभिनंदन करायचे सोडून भाजपच्या सदस्याचे अभिनंदन करायला सांगितलं जातं. हा खेळाडूंचा अपमान आहे. भाजपला देशाशी काही देणे घेणे नाही. अशा विषयावर भाजपच्या सदस्यांना बोलू दिलं जातं. आज पक्षपातीपणाचा कळस झाला आहे," असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.
"देशाची मान उंचावणाऱ्या खेळाडूंच्या अभिनंदनाचा ठराव आम्ही पास केला. पण त्यामध्ये अशा पद्धतीने चमचेगिरी करणे आणि सभापतींनी ती सहन करणे आणि विरोधी पक्षनेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेल्याने आम्ही सभागृहातून बाहेर पडलो. शरद पवार हे आयसीसीचे अध्यक्ष होते. ज्या कोणाचे भाजपवाले चमचेगिरी करत आहेत ते अध्यक्ष नाहीत. किती लाळघोटेपणा करायचा. भारतीय खेळाडूंचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या गोष्टीला आमचा विरोध होता," असे काँग्रेस आमदार भाई जगताप म्हणाले.