धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - इतर मागास वर्गाबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याने न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावल्याने गांधी यांनी समस्त इत्तर मागासवर्गीय समाजा बद्दल माफी मागावी अशी मागणी करत भाजपाने भाईंदर मध्ये आंदोलन करत गांधी यांचा निषेध केला.
भाईंदर पश्चिमेस भाजपा जिल्हा कार्यालया बाहेर शनिवारी जिल्हाध्यक्ष ऍड. रवि व्यास यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने राहुल यांच्या विरुद्ध आंदोलन केले . आंदोलनात माजी नगरसेवक सुरेश खंडेलवाल , पंकज पांडेय , रिटा शाह , जयेश भोईर, शुभांगी कोटियन , चंद्रकांत मोदी सह भाजपा ओबीसी सेलचे सुधीर कांबळी व रिया म्हात्रे , शैलेश म्हामुणकर व पदाधिकारी - कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना "मोदी" या आडनावावरुन अपमानास्पद टिप्पण्णी करताना ओबीसी तेली समाजबांधवांचा अपमान केला. न्यायालयाने या बद्दल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. आपण कोणालाही अपमानित करावे हा आपला अधिकार आहे असे राहुल गांधींना वाटत असेल तर त्यांच्या वक्तव्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीला त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असे ऍड. रवि व्यास म्हणाले.