सचिन सावंत यांचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय जनता पक्षाने सेलिब्रिटींवर दबाव आणून शेतकरी आंदोलनाविरोधात ट्विट करण्यास भाग पाडले हा काँग्रेसचा आरोप सत्य होता हे सिद्ध झाले आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत भाजपाच्या आयटी सेल व १२ व्यक्तींचा हात होता हे समोर आले आहे. देशविरोधी केलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला आहे. भाजप आयटी सेल व १२ जणांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी मंगळवारी केली.
सावंत म्हणाले, भाजपच्या चौकशीची मागणी करून अनेक दिवस उलटल्यानंतरही या देशाच्या राष्ट्रीय हिरोंपैकी एकाही व्यक्तीने पुढे येऊन सदर ट्विटद्वारे मांडलेले मत हे त्याचे स्वतःचे होते असे सांगितले नाही. देशपातळीवर एवढे मोठे वादळ उठून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावेडकर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपातर्फे केलेले षडयंत्र लपवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी भारतरत्न लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांच्यामागे लपून राज्य सरकार या भारतरत्नांची चौकशी करणार, असा खोटा कांगावा केला. परंतु आता सत्य समोर आले असून या पुढच्या चौकशीतून भाजपचा देशविरोधी कट समोर आल्याशिवाय राहणार नाही.
देशाकरिता सर्वाधिक घातक व विषारी टूलकिट हे भाजपचे आहे. या टूलकिटमधून लोकशाही नष्ट करण्याचे काम केले जात असल्याचे पर्यावरणवादी दिशा रवी या युवतीला अटक करून सिद्ध करण्यात आले आहे. तिच्यासह महाराष्ट्रातीलही काही जणांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यामागे युवापिढी व मध्यमवर्गाचा आवाज दाबला जाऊन शेतकऱ्यांबरोबर तो आवाज सामील होऊ नये हा त्यांचा उद्देश आहे. परंतु बालाकोटसारख्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर अर्णब गोस्वामी यांच्याकडे अगोदरच माहिती कशी आली, याची साधी विचारणाही केली जात नाही. ऑफिशियल सिक्रेट ॲक्टच्या कलम ५ चे उल्लंघन झालेले असतानाही त्याच्यावर खटला का दाखल होत नाही हा प्रश्न निश्चितपणे देशाच्या जनतेसमोर आहे. अर्णब गोस्वामींविरोधातील कारवाईसंदर्भात राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, या मागणीचा पुनरुच्चार सावंत यांनी केला.
.....................