स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी

By यदू जोशी | Published: June 16, 2024 08:15 AM2024-06-16T08:15:44+5:302024-06-16T08:16:20+5:30

अशोक चव्हाणांवर चिखलीकरांनी डागली होती तोफ, पराभवाच्या कारणांचा भाजप घेणार शोध

bjp radhakrishna vikhe patil will investigate allegations on ashok chavan | स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी

स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेणे आणि लगेच त्यांना राज्यसभा देणे यामुळे नांदेड मतदारसंघात भाजपविरोधी वातावरण तयार झाले आणि निकालात त्याचा फटका बसला, असा आरोप या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार प्रताप पाटील- चिखलीकर यांनी केला असतानाच आता या आरोपांसह चिखलीकरांच्या पराभवाची कारणे शोधून अहवाल सादर करण्याची जबाबदारी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विखे परिवार आणि चव्हाण परिवार यांचे अनेक वर्षापासूनचे ऋणानुबंध आहेत.

महायुतीला पराभव पत्करावा लागलेल्या ३३ मतदारसंघासाठी भाजपने निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. तसेच ज्या १७ मतदारसंघांमध्ये महायुती विजयी झाली तेथेही निरीक्षक पाठविण्यात येणार आहेत. सर्वांना २२ जूनच्या आत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

भाजपने २८ जागा लढविल्या होत्या पण प्रदेश भाजपने शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या वाट्याला गेलेल्या मतदारसंघांमधील जय- पराजयाची कारणे शोधून काढण्याचे ठरविले आहे. विधानसभा निवडणुकीचा तिन्ही पक्ष म्हणून एकत्रितपणे विचार करताना हे अहवाल महत्त्वाचे ठरतील, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

सर्व बाबींची होणार चौकशी

हे निरीक्षक प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांमधील प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि जुन्याजाणत्या नेत्यांशी चर्चा करून जय- पराजयाची कारणे समजून घेतील.

नांदेडमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध • चिखलीकर हा संघर्ष जुना आहे. अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेश आणि खासदारकी देणे हे पराभवाचे कारण असल्याचे चिखलीकर यांनी म्हटले आहे. केवळ नांदेडच नव्हे तर प्रत्येक • लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये समन्वय होता की नाही, भाजपचे कोणते नेते सक्रिय होते, कोण निष्क्रिय होते, भाजप अंतर्गत गटबाजीचा कुठेकुठे फटका बसला अशा सगळ्या मुद्यांवर निरीक्षक अहवाल देणार आहेत.

बारामती पराभवाची कारणे लोढा शोधणार

■ कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांना बारामती मतदारसंघात निरीक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे. सुनेत्रा पवार यांच्या पराभवाची कारणे ते शोधून काढतील. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा अडीच लाखांहून अधिक मतांनी चंद्रपूरमध्ये पराभव झाला. तेथील अहवाल आ. श्रीकांत भारतीय देतील. भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातील पराभवाची कारणे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील शोधून काढतील. बीडमधील पंकजा मुंडेंच्या पराभवाची कारणमीमांसा माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर करतील.

अन्य काही निरीक्षक असे

रामटेक - खा. अनिल बोंडे, अमरावती आशिष देशमुख, वर्धा - आ. प्रवीण दटके, भंडारा-गोंदिया रणजीत पाटील, यवतमाळ-वाशिम - आ. आकाश फुंडकर, दिडोरी विजयाताई रहाटकर, हिंगोली- आ. संजय कुटे, उत्तर-पश्चिम मुंबई सुनील कर्जतकर, दक्षिण मुंबई - माधवी नाईक, उत्तर-मध्य मुंबई- हर्षवर्धन पाटील, उत्तर-पूर्व मुंबई - आ. राणा जगजितसिंह, मावळ आ. प्रवीण दरेकर. अहमदनगर- खा. मेधा कुलकर्णी, माढा आ. अमित साटम, भिवंडी - गोपाळ शेट्टी.

Web Title: bjp radhakrishna vikhe patil will investigate allegations on ashok chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.