मुंबई: वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) शुक्रवारी होऊ घातलेला भाजपचा महामेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या महामेळाव्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून त्यामुळे मुंबईकर प्रचंड संतापले होते. या नागरिकांनी वांद्रयात भाजपा कार्यकर्त्यांच्या बस रोखून धरल्या होत्या. त्यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलीस या नागरिकांना हटविण्यासाठी त्याठिकाणी आले तेव्हादेखील बाचाबाचीचा प्रकार घडला. एकूणच सध्या भाजपाच्या महामेळाव्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. आजच्या मेळाव्यासाठी राज्यभरातून भाजपाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. या मेळाव्यासाठी राज्यभरातून ५ लाख कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र, वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे सध्या या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वांद्र्यात तर कालपासून सातत्याने रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. पश्चिम द्रूतगती मार्गावर कालपासून मोठी वाहतूक कोंडी होत आहे. काल अमित शाहांच्या स्वागतासाठी भाजपने सांताक्रूझ विमानतळ ते बीकेसीपर्यंत बाईक रॅली काढली होती. मात्र, यामुळे तब्बल 4 ते 5 तास वाहतूक रखडली होती. यामुळे अनेकांना विमानतळावर वेळेत पोहोचता आले नव्हते. आज सकाळीदेखील वाहतूक कोंडीचे हे चित्र कायम आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. वांद्रे टर्मिनसहून बीकेसीकडे जाण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना बस मिळते. पण सामान्य मुंबईकरांना बस मिळत नाही. त्यामुळे संतापलेल्या मुंबईकरांनी बीकेसीकडे जाणारी भाजप कार्यकर्त्यांची बस अडवली. त्यानंतर पोलिसांनी याठिकाणी येऊन या नागरिकांना दूर केले. परंतु, नागरिकांनी पोलिसांशी प्रचंड हुज्जत घातली. यावेळी त्यांनी वाहतूक कोंडीबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला. परंतु, पोलिसांकडून मात्र वाहतूक सुरळीत असल्याचा दावा करण्यात आला.भाजपाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यभरातून ३४ रेल्वेगाड्यांमधून भाजपाचे कार्यकर्ते येथे दाखल होणार असून, सात हजारांहून अधिक बसमधून कार्यकर्ते पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाहून येथे येणार आहेत. याशिवाय दहा हजार लहान वाहनांतून कार्यकर्ते बीकेसीत आले आहेत. यादृष्टीने पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या चार चेक नाक्यांवर मालवाहने आणि अन्य अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बेस्टकडूनही १७० जादा बसगाडय़ांचे नियोजनही करण्यात आले आहे. सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहनांसाठी नियमावली आखून देण्यात आली आहे. मुलुंड पूर्वेकडील आनंद नगर चेक नाका, मुलुंड पश्चिमेकडील मॉडेला चेक नाका, ऐरोली चेक नाका आणि वाशी चेक नाक्यांवर अवजड आणि मालवाहतूक वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यासाठी ठाणे शहर, ठाणे ग्रामीण आणि नवी मुंबई पोलिसांनी अवजड आणि मालवाहतूक वाहनचालकांना अन्य मार्गाचा वापर करण्याची सूचना करण्यास सांगण्यात आले आहे. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, एलबीएस रोडवरील सुर्वे जंक्शन, सायन जंक्शन, धारावी टी-जंक्शन, हंसभुग्रा मार्ग, सीएसटी रोड, नेहरू रोड, शारदादेवी रोडवरील प्रवास टाळा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पूर्व उपनगरातील जेव्हीएलआर, एलबीएस रोड आणि ईस्टर्न फ्री वे तर पश्चिम उपनगरातील एस. व्ही. रोड लिकिंग रोड वाहनचालकांसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि प्रवाशांनी त्याप्रमाणे नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे.
भाजपाच्या महामेळाव्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी; संतापलेल्या मुंबईकरांनी भाजपाची बस अडवली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 10:36 AM