मुंबई- भाजपाने आज स्थापना दिनानिमित्त मुंबईत जंगी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. वांद्रे कुर्ला क्रीडा संकुलातील एमएमआरडीए ग्राऊंडवर हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत.पण भाजपाच्या या मेळाव्याचा मोठा फटका मुंबईकरांना बसण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे. मुंबईत येणाऱ्या अवजड वाहनांना आज प्रवेश बंद करण्यात आला असून नवी मुंबई आणि ठाण्याहून येणाऱ्या अवजड वाहनांचा मार्ग बदलण्यात येणार आहे. किंवा आजच्या दिवसासाठी प्रवेश बंद असेल, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.
सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहनांसाठी नियम तयार करण्यात आले आहेत. मुलुंड पूर्वेकडील आनंद नगर चेक नाका, मुलुंड पश्चिमेकडील मॉडेला चेक नाका, ऐरोली चेक नाका आणि वाशी चेक नाक्यांवर अवजड आणि मालवाहतूक वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यासाठी ठाणे शहर, ठाणे ग्रामीण आणि नवी मुंबई पोलिसांनी अवजड आणि मालवाहतूक वाहनचालकांना अन्य मार्गाचा वापर करण्याची सूचना केली आहे. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, एलबीएस रोडवरील सुर्वे जंक्शन, सायन जंक्शन, धारावी टी-जंक्शन, हंसभुग्रा मार्ग, सीएसटी रोड, नेहरू रोड, शारदादेवी रोडवरील प्रवास टाळणं फायद्याचं ठरणार आहे. पूर्व उपनगरातील मुंबईकरांनी जेव्हीएलआर, एलबीएस रोड, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे या मार्गांचा, तर पश्चिम उपनगरातील प्रवाशांनी एसव्ही रोड, लिंकिंग रोड या मार्गांचा वापर करावा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.
तसंच परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि प्रवाशांनी नियमावलीनुसार नियोजन करावं, असं मुंबई पोलिसांनी ट्विटवरवरून जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.