भाजपाचं रेटकार्ड! शाखाप्रमुखापासून ते खासदारापर्यंत, राऊतांनी आकडेच सांगितले अन् मुलांचीही घातली शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 11:00 AM2023-02-21T11:00:00+5:302023-02-21T11:00:58+5:30
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हासाठी गेल्या सहा महिन्यांमध्ये २ हजार कोटींचा सौदा झालेला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता.
मुंबई-
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हासाठी गेल्या सहा महिन्यांमध्ये २ हजार कोटींचा सौदा झालेला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता भाजपानं पक्षफोडीसाठीचं रेटकार्डच तयार केलेलं असल्याचा नवा आरोप केला आहे. देशात रेटकार्डाचं राजकारण पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. भाजपानं रेटकार्ड तयार केलं असून यात शाखाप्रमुखापासून ते खासदारापर्यंत सर्वांचे रेट फिक्स केले गेलेत. त्यासाठी एजंटही नेमले गेलेत, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसंच ही गोष्ट खोटी असेल तर त्यांनी आपल्या मुलांची शपथ घेऊन सांगावं, असंही राऊत म्हणाले. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
"देश आज पहिल्यांदाच असं रेटकार्डचं राजकारण पाहात आहे. भाजपानं रेटकार्डच बनवलंय. यात शाखाप्रमुखासाठी ५० लाख, नगरसेवकासाठी २ कोटी, आमदारासाठी ५० कोटी, खसदारासाठी ७५ कोटी असे प्रत्येकाचे रेट ठरलेले आहेत. इतकंच नव्हे, तर यासाठी एजंटही ठेवले गेलेत. इतका पैसा आला कुठून? कुठे गेली ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स?", असं संजय राऊत म्हणाले. ही बाब खोटी असल्याचं त्यांनी आपल्या मुलांची शपथ घेऊन सांगावं, असंही राऊत पुढे म्हणाले.
लोकशाहीची वाटचाल वधस्तंभाकडे
"सर्वोच्च न्यायालय देशातील जनतेसाठी आणि लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी शेवटचा आशेचा किरण आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयासमोर आम्ही आयोगाच्या अतिरेकी निर्णयाविरोधात भूमिका मांडायचं ठरवलं आहे. आम्हाला खात्री आहे की देशात जे काही चाललंय याचा काळजीपूर्वक विचार करुन वधस्तंभाकडे चाललेली लोकशाही जीवंत ठेवण्याचं काम सर्वोच्च न्यायालय करेल", असं संजय राऊत म्हणाले्.