मीरा रोड : राज्यातील सत्तेचे समीकरण जुळवताना अपक्ष आमदारांना देखील मोठे महत्व आले असून मीरा भाईंदरच्या भाजपाच्या बंडखोर आमदार गीता जैन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा भेट घेत अपेक्षेप्रमाणे भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. स्वत: मुख्यमंत्री व भाजपाने देखील गीता जैन यांनी पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे.मीरा भाईंदरमधून भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणून भाजपाच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका असलेल्या गीता जैन यांनी पक्ष श्रेष्ठींकडे जोरदार प्रयत्न केले होते. परंतु विद्यमान भाजपा आमदार नरेंद्र मेहतांविरोधात रोष असताना देखील ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याने त्यांना भाजपाने उमेदवारी दिली. या मुळे गीता यांनी मेहतांविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. पालिकेत एकहाती सत्ता, पक्ष व अन्य समर्थक धरुन तब्बल ६३ नगरसेवक , घरातलाच महापौर आणि भाजपाचे संघटन अशी मोठी ताकद मेहतांसोबत होती. मेहतांनी तर प्रचारात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भोजपुरी स्टार रवी किशन, मनोज तिवारी तसेच किरण माहेश्वरी आदी दिग्गज उतरवले होते. तरी देखील मेहतांचा दारुण पराभव झाला.
शिवसेनेने देखील उघडपणे गीता जैन यांना साथ देऊन मेहतांच्या पराभवात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे गीता जैन यांच्या विजयानंतर सेनेने देखील त्यांना आपल्या सोबत येण्यासह सत्तेत मानाचे पद देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु गीता यांनी आधीपासूनच भाजपाशी आपली लढाई नसून शहरातील भ्रष्टाचार, हुकुमशाही, गुंडगीरी व मनमानी विरोधातला हा लढा असल्याचे स्पष्ट केले होते. त्या अनुषंगाने निवडून आल्या नंतर दुसरायाच दिवशी त्यांना मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष आदींना पाचारण करुन पुन्हा स्वगृही भाजपा सोबत येण्याचे आवाहन केले होते.आज रविवारी पुन्हा मुख्यमंत्र्यांशी गीता व त्यांचे पती भरत जैन यांनी भेट घेऊन मीरा भार्इंदर महापालिका आणि शहरातील सर्व परिस्थितीबाबत चर्चा केली. मुख्यमंत्री व प्रदेश भाजपाने देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर गीता जैन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भाजपाला पाठिंबा दर्शवल्याचे म्हटले आहे. गीता जैन यांनी देखील भाजपाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट केले आहे.मीरा भार्इंदर मतदार संघात भाजपा समर्थक वर्ग जास्त असल्याचे मानले जाते. परंतु यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन यांनी घेतलेली ५५ हजार मतं तसेच भाजपा उमेदवारा विरोधात गीता यांना मिळालेली तब्बल ८० हजार मतं पाहता मेहतां मुळे भाजपाच्या हातुन भविष्यात महापालिका आणि मतदार संघ गमावण्याची भिती निर्माण होणे स्वाभाविकच आहे. त्यातच महापालिकेत भाजपाचे गीता यांना धरुन एकुण ६१ नगरसेवक आहेत. शिवाय सेनेच्या अनिता पाटील, काँग्रेसचे नरेश पाटील आणि काँग्रेस समर्थक अमजद शेख यांनी भाजपाची कास धरली आहे.मुळात नरेंद्र मेहतांना आधी पासुनच महापालिकेत स्वारस्य राहिले आहे. त्यामुळे त्यांनी भावजय डिंपल यांना महापौर पदी बसवले आहे. परंतु भाजपाच्या अनेक नगरसेवकां मध्ये मेहतां बद्दल नाराजी आहे. पण मेहतांच्या दबावतंत्रा मुळे त्यांच्या विरोधात कोणी सहसा ब्र काढत नाही. पालिका, पोलीस, महसुल आदी प्रशासन देखील मेहतांची बटिक बनत त्यांच्या कला प्रमाणे नाचत आली आहे.त्यामुळे मेहतांच्या एकाधिकारशाही व चुकीच्या प्रकारांना आळा घालायचा असेल तर अनेक नगरसेवकांसह भाजपा आणि संघाच्या कार्यकर्त्यांची देखील गीता यांनी भाजपा सोबत येऊन शहराची सुत्रं हाती घ्यावी अशी अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने गीता यांची मुख्यमंत्र्यांसह पक्ष नेतृत्वाशी चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपा सोबत राहुन गीता ह्या मेहतांना पालिकेत शह देण्याची शक्यता आहे.