मुंबई: राज्यातील घटनांनी विचलित होऊ नका. भाजपकडून बऱ्याच हालचाली सुरू आहेत. त्यांचा सामना करण्यास आम्ही समर्थ आहोत. भाजपची स्वप्ने कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणार नाही. भाजपला कितीही प्रयत्न करू द्यात, पण मी राज्यात त्यांना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले होते. याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांनी भाजपची काळजी करू नये. आधी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनवून दाखवा, असे आव्हानच भाजपने दिले आहे.
महाविकास आघाडीतील तरुण आमदारांनी शरद पवार यांची भेटली. यावेळी शरद पवारांनी तरुण आमदारांना महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल. तसेच तुम्ही मतदारसंघातील कामांवर लक्ष केंद्रीत करा, असे सांगत त्यांना आश्वस्त केले. याशिवाय, आपण लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. यानंतर भाजपने ट्विटरवरून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा
आदरणीय, शरद पवार साहेब भाजपची काळजी करू नका. स्वतःच्या पक्षाचे ६० च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी १० वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. ५५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा, असे आव्हानच भाजपने ट्विटरवरून दिले आहे.
मराठा, OBC आरक्षणाचा प्रश्न सोडून दाखवा
दुसऱ्या एका ट्विटमध्ये भाजपने म्हटले आहे की, आदरणीय शरद पवारजी, भाजपला येऊ न देण्याच्या गोष्टी नंतर करा. आधी राज्यातील प्रश्न सोडून दाखवा. राज्यात एसटी बंद, ६ महिन्यापासून कर्मचारी संपावर आहेत. राज्यात एसटी बंद, ६ महिन्यापासून कर्मचारी संपावर आहेत. मराठा, OBC आरक्षणाचा प्रश्न सोडून दाखवा, असे सांगत भाजपने पलटवार केला आहे.
दरम्यान, गोव्यातील मोठ्या विजयानंतर गोव्याचे प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपची सत्ता पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणणारच असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केला. यानंतर शरद पवारांनी भाजपची सत्ता आणू देत नाही, असे म्हटले.