Join us

“किती रडारड करणार, उद्धव ठाकरे तुमचा हिंदुत्वाशी काही संबंध उरला आहे का?”; भाजपचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 4:51 PM

BJP Replied Uddhav Thackeray: कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय अन् राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशात भाजप जिंकली की ईव्हीएमवर शंका, असे सांगत भाजपने प्रत्युत्तर दिले.

BJP Replied Uddhav Thackeray: देशभरातील पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने तीन राज्यांत मोठा विजय मिळवला. तर काँग्रेसने बीआरएसला धोबीपछाड देत तेलंगण काबीज केले. मात्र, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. यानंतर आता विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएम यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात केलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

तुमची एवढी लाट आहे, तर त्या लाटेमध्ये एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. लोकसभा ही देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. तुमच्यात एवढा आत्मविश्वास असेल आणि हिंमत असेल तर उद्या होणारी लोकसभेची एकच निवडणूक देशभरात बॅलेट पेपरवर घेऊन जिंकून दाखवावी, असे खुले आव्हान उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिले आहे. यावरून आता भाजपने उत्तर दिले आहे. भाजपने अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट शेअर केली आहे. 

उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला आहे का?

उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे. राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर वही बनाऐंगे लेकीन तारीख नहीं बताऐंगे अशी टीका तुम्हीच केली होती पण आता २२ जानेवारी रोजी मंदिराचं लोकार्पण होतंय. त्यामुळे तुमच्या पोटात गोळा उठला आहे. कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की इव्हीएमवर शंका. उद्धव ठाकरे किती रडारड करणार? असा सवाल भाजपने केला आहे. 

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावात, अशी मागणी केली आहे. तसेच अमेरिकासारख्या देशाने ईव्हीएम बंद केले आहे. भारतातही लोकांच्या मनात संभ्रम आहे. निवडणूक प्रामाणिकपणे घेतो असे तुम्ही सांगता, तर एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. उद्धव ठाकरे म्हणाले तसा प्रयोग झाला पाहिजे. त्यामुळे लोकांच्या मनातील संशय दूर होईल, अशी मागणी करीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएमबाबत मांडलेल्या भूमिकेचे समर्थन केले. 

टॅग्स :भाजपाउद्धव ठाकरेलोकसभानिवडणूक