भाजपाने आणले शिवसेनेला अडचणीत
By admin | Published: July 8, 2017 06:18 AM2017-07-08T06:18:27+5:302017-07-08T06:18:27+5:30
मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह, तरण तलाव व अंधेरीतील राजे शहाजी क्रीडा संकुलाचा कारभार ललित कला व क्रीडा मंडळ चालवीत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह, तरण तलाव व अंधेरीतील राजे शहाजी क्रीडा संकुलाचा कारभार ललित कला व क्रीडा मंडळ चालवीत आहे. शिवसेनेचे सचिव मात्र या दोन्ही ठिकाणी खेळापेक्षा व्यापारावर भर देत असल्याने संस्थेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार भाजपाने पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
ललित कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महापौर व उपाध्यक्ष हे महापालिका आयुक्त असतात. तरी मुख्य विश्वस्त हे शिवसेना सचिव आदेश बांदेकर आहेत. मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह व क्रीडा संकुलाचे नूतनीकरण करण्यासाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले. परंतु या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होऊनही अद्याप त्याचे लोकार्पण करण्यात आलेले नाही. याबाबत ललित कला व क्रीडा मंडळाच्या वतीने कुठलेही प्रयत्न होत नसल्यामुळे नाट्यगृह तसेच तरण तलावापासून नागरिक वंचित आहेत.
दोन्ही संकुलांची जागा लग्न समारंभ तसेच इतर कामांसाठी भाड्याने देऊन कला व क्रीडा जोपासण्याऐवजी व्यापारीकरण सुरू केल्याचा आरोप भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी केला आहे. मंडळामधील ११०पैकी ८५ कर्मचाऱ्यांनी या गैरकारभाराबाबत आयुक्तांकडे तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले. विश्वस्त मंडळ बरखास्त करून हे मंडळ पालिकेने आपल्या ताब्यात घेण्याची मागणी भाजपाने आयुक्तांकडे केली होती. याची दखल घेत आयुक्तांनी पालिकेचे उपायुक्त राम धस व सुधीर नाईक यांची चौकशी समिती नेमली.
कायदेशीर कारवाईचे संकेत
ही समिती या मंडळामधील आर्थिक व इतर गैरव्यवहारांची चौकशी करून पालिका आयुक्तांना अहवाल देणार आहे. त्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.
भाजपाचे शिवसेनेला आव्हान
भाजपाचे स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी मंडळाचे अध्यक्ष महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही त्यांच्याकडून याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे नाट्यगृह आणि तरण तलावाचे त्वरित लोकार्पण केले जावे, अन्यथा भाजपा ते जनतेसाठी खुले करून देईल, असा इशारा भाजपाने दिला आहे.