नवी मुंबई : महायुतीतील छोट्या मित्र पक्षांना भाजपाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देत रिपाइंने (आठवले गट) समविचारी पक्षांच्या मदतीने स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी रिपब्लिकन बहुजन विकास आघाडीची स्थापना करण्याचा निर्णय आज झालेल्या एका संयुक्त बैठकीत घेण्यात आला. या आघाडीच्या माध्यमातून महापालिकेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्धार करण्यात आला आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरण पूर्णत: बदलले आहे. या बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी लहान-मोठे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. रिपाइं हा महायुतीचा घटक पक्ष असला तरी सध्या तो भाजपासोबत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपाबरोबर युती व्हावी, असा पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा आग्रह आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून भाजपासोबत वाटाघाटी सुरू आहेत. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने रिपाइंत संभ्रम आहे. राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपाकडून युतीबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नाही. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता ती शक्यताही धूसर झाली आहे. रिपाइंच्या नेतृत्वाखाली समविचारी पक्षांची बैठक झाली. त्यात रिपब्लिकन बहुजन विकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रिपाइंच्या युवक आघाडीचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी दिली. (प्रतिनिधी)च्रिपाइं व इतर मित्र पक्षांबरोबर युती करण्याबाबत भाजपाची भूमिका सकारात्मक आहे. मात्र हा निर्णय राज्य पातळीवरचा आहे. येत्या एक दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे याबाबतचा अंतिम निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सी.व्ही.रेड्डी यांनी दिली.
भाजपा, रिपाइंची युती धूसर?
By admin | Published: March 19, 2015 12:08 AM