Join us

'भाजप-आरएसएसची बैठक, महाराष्ट्रात एकटं लढण्याचं ठरलं'; आव्हाडांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 9:27 AM

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांमध्ये नागपुरात नुकतीच एक बैठक पार पडल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

मुंबई : मागील काही वर्षांत महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड अस्थिर झालं आहे. युती आणि आघाडीचं समीकरण सातत्याने बदलत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेमकं काय समीकरण असणार, याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. भाजप महाराष्ट्रात आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसंच याबाबत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांमध्ये नागपुरात नुकतीच बैठक पार पडल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, " नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असं ठरवण्यात आलं," असा दावा आव्हाड यांनी केला आहे.

"...तर कमळावर निवडणूक लढवावी लागणार" 

उद्धव ठाकरे यांना आव्हान देत शिवसेनेतून बंड केलेल्या आणि शरद पवार यांना आव्हान देत राष्ट्रवादीतून बंड केलेल्या गटाने भाजपसोबत युती केली आहे. या दोन्ही गटाच्या नेत्यांना इशारा देत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, " ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असं भाजप-आरएसएसच्या बैठकीत ठरवण्यात आलं.  ज्यांना राजकारण समजतं; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजलं असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही," असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या दाव्यााबाबत अद्याप सत्ताधारी महायुतीकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा