Join us

Helmet in Mumbai: "दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती म्हणजे 'आजार म्हशीला आणि औषध..."; भाजपाची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 1:07 PM

उद्यापासून मुंबईत नवा नियम होणार लागू

Helmet in Mumbai: दुचाकी चालवताना व्यक्तिने हेल्मेट घातले नसेल तर दंड भरावा लागणं ही बाब आता मुंबईकरांसाठी सवयीची बनली आहे. पण उद्यापासून मुंबईत दुचाकीवर स्वार असलेल्या दोघांनाही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता मागे बसणाऱ्याने हेल्मेट घातले नसले तरीही दुचाकीस्वाराकडून दंड आकारण्यात येणार आहे. दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतला आहे. त्याआधी मुंबईकरांना १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मुंबई पोलीस आयुक्तांच्या या निर्णयावर भाजपाकडून खोचक शब्दात टीका करण्यात आली.

दुचाकीवर स्वार असलेल्या दोघांनाही हेल्मेट घालावे लागणार असल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी ९ जूनपासून करण्यात येणार आहे. या मुद्द्यावर भाजपाने नाराजी व्यक्त केली असून खोचक टीका केली आहे. 'मुंबई शहरात दुचाकीवरील सह प्रवाशाला हेल्मेट सक्ती करणे हा पोलीस आयुक्तांचा निर्णय अत्यंत बालीश पणाचा आणि अन्यायकारक आहे. या निर्णयावर मुंबईकरांमध्ये संतप्त भावना आहे हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी गुहमंत्र्यांकडे पत्र पाठवून केली आहे. निर्णय रद्द न केल्यास भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. पोलीस आयुक्तांचा हा निर्णय म्हणजे 'आजार म्हशीला आणि औषध पखाल्याला' असे आहे. दुचाकीवर ऐनवेळी बसणाऱ्याने हेल्मेट कुठून आणायचं?, दुचाकीमध्ये दोन हेल्मेट ठेवण्याची जागा असते का? ताशी ४० किमीपेक्षा कमी वेगात वाहन चालवले जात असताना हेल्मेटची गरज काय?' असे काही तिखट सवाल करत आमदार अतुल भातखळकर यांनी हेल्मेटसक्तीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

तसेच, 'हेल्मेट सक्ती त्वरित मागे घेण्यात यावी. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याl गांभीर्याने लक्ष देऊन तसा निर्णय जाहीर करावा अन्यथा भाजपाच्या आंदोलनास सामोरे जाण्यासाठी सज्ज रहावे', असा इशाराही भातखळकर यांनी पत्राद्वारे दिला.

दरम्यान, गुरुवारपासून दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी मुंबईत जागोजागी वाहतूक पोलीस तैनात केले जाणार आहेत. या प्रकरणी मुंबईकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. गुरुवारपासून दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाने हेल्मेट परिधान केले नसेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आम्ही त्यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करू आणि त्यांना ५०० रुपयांचा दंड ठोठवू, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :मुंबईभाजपाबाईकटू व्हीलर