मुंबई : घाटकोपर येथील मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसूतिगृहाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले. मात्र या कार्यक्रमादरम्यान पुन्हा एकदा भाजपा-सेनेचे कार्यकर्ते श्रेयवादावरून आक्रमक झाल्याचे दिसून आले. याप्रसंगी, भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदार आल्याशिवाय उद्घाटन करू देणार नाही, अशी भूमिका घेत गोंधळ घातला. याप्रसंगी महापौर म्हणाले, आमची बांधिलकी ही जनतेशी असून नागरिकांना दर्जेदार सेवा-सुविधा देणे तसेच मुंबईचा सर्वांगीण विकास करणे यासाठी सदैव कटिबद्ध आहोत.उद्घाटन सोहळ्यादरम्यान महापौर म्हणाले की, अनेक वर्षांपासून बंद असलेले हे प्रसूतिगृह सुरू होण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू होते. या ठिकाणी नव्याने एनआयसीयूसुद्धा सुरू करावे, अशी सूचना उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) यांना केली होती. यावर त्यांनी या ठिकाणी एनआयसीयू सुरू करण्याला होकार दिला असल्याचे महापौरांनी या वेळी सांगितले. स्थानिक आमदार राम कदम या वेळी म्हणाले, जो कंत्राटदार नूतनीकरणाचे काम करणार आहे, त्याने चांगले दर्जेदार काम करावे.याप्रसंगी भाजपा-सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या गोंधळाविषयी विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले की, हा वाद घालण्याचा विषय नव्हता. आम्ही आमचे काम केले. आमच्या स्थानिक नगरसेविका या विभागात आहेत. त्यामुळे भाजपा आमदाराने त्यांच्या विधिमंडळातील कामकाजाकडे लक्ष द्यावे. उगाच पालिकेच्या कामांत ढवळाढवळ करू नये. तर याबाबत आमदार राम कदम म्हणाले, हा पालिकेचा कार्यक्रम होता, त्यामुळे प्रोटोकॉलनुसार तेथे हजर राहिलो.
भाजपा-सेनेचे कार्यकर्ते भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:54 AM