BJP-Silver Oak Attack: “सिल्व्हर ओक हल्ल्याची विश्वास नांगरे पाटलांना कल्पना होती, चौकशीचा फार्स कशाला”: भाजप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 05:36 PM2022-04-12T17:36:18+5:302022-04-12T17:37:52+5:30
जब सैय्या भए कोतवाल, तो डर काहे का, असा खोचक टोला भाजपने लगावला आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी हिंसक आंदोलन केले. या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. तर, यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. यानंतर आता भाजपने एक पत्रच सोशल मीडियावर शेअर केले असून, विश्वास नांगरे पाटील यांना याची कल्पना होती, असा दावा केला आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांकडून चौकशीचा फार्स कशाला, अशी विचारणा केली आहे.
भाजपने आपल्या ट्विटर हँडलवरून एक पत्र शेअर केले आहे. याच्या कॅप्शनमध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलजी कशाला सिल्वर ओक आंदोलनाच्या चौकशीचा फार्स करताय? ज्या विश्वास नांगरे-पाटील यांना घटनेपूर्वी माहिती मिळूनही ते महाविकास आघाडीच्या सर्वोच्च नेत्याला सुरक्षा पुरवत नाहीत आणि तरीही तुम्ही त्यांनाच चौकशी प्रमुख नेमता? जब सैय्या भए कोतवाल, तो डर काहे का, असा खोचक टोला भाजपने लगावला आहे.
भाजपने शेअर केलेल्या पत्रात काय?
भाजपने शेअर केलेल्या पत्रात, ४ एप्रिल रोजी हे पत्र गुन्हे अन्वेषण विभागाचे उपर पोलीस आयुक्त निशीथ मिश्र यांनी मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस सह आयुक्तांना पाठवले होते. या पत्रामध्ये एसटी कर्मचारी किंवा आंदोलन हे अधिक आक्रम होऊन आंदोलन करणार असल्याचे नमूद केले आहे. विलनीकरणाच्या मुद्द्यावरुन १० नोव्हेंबरपासून ते २४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आझाद मैदानामध्ये ठिय्या आंदोलन सुरु होते. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. २५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत आंदोलनाचे आयोजक गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरु होते. १ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत या आंदोलनाचे नेतृत्व कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. २१ डिसेंबरपासून कृष्णन नारायण कोरे, ताजुउद्दीन मुनीर उद्दीश शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाची सुनावणीची तारीख ५ एप्रिलची असून, आझाद मैदानात १५०० ते १६०० महिला आणि पुरुष आंदोलकर्ते आहेत. आंदोलनकर्त्यांची संख्या वाढत आहे. निर्णय विरोधात लागण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी ४ एप्रिल रोजी मंत्रालय आणि ५ एप्रिल रोजी सिल्व्हर ओक तसेच मातोश्री बंगला या ठिकाणी आंदोलनाचा धमकीवजा इशारा दिला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे या पत्रात म्हटले आहे. एसटी कर्मचारी खासगी वाहने किंवा रेल्वेने येण्याची शक्यता आहे. मुलुंड चेक नाका, वाशी चेक नाका आणि दहिसर चेक नाका येथून प्रवेश करणार असून या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्याची विनंती या पत्रद्वारे केली होती.
मा. गृहमंत्री @Dwalsepatil जी कशाला सिल्वर ओक आंदोलनाच्या चौकशीचा फार्स करताय?
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 12, 2022
ज्या विश्वास नांगरे-पाटील यांना घटनेपूर्वी माहिती मिळूनही ते मविआच्या सर्वोच्च नेत्याला सुरक्षा पुरवत नाहीत आणि तरीही तुम्ही त्यांनाच चौकशी प्रमुख नेमता.
जब सैय्या भए कोतवाल, तो डर काहे का? pic.twitter.com/iDuQ98lo1R