PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी आयएनएस सभागृहात झालेल्या दोन तासांच्या संवादात मोदी यांनी विकासविषयक काही आमदार, मंत्र्यांची मते जाणून घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रास्ताविकात महायुतीचे मोठे यश आणि सरकारची भविष्यातील वाटचाल यावर मत व्यक्त केले.
महायुतीच्या तीन पक्षांमधील समन्वय खाली गावांपर्यंत गेला पाहिजे. तिन्ही पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या कार्यक्रम, सभांना जायला हवे. डबे पार्टी करा, असा सल्ला देताना, सामान्य जनता बोलत नाही, पण तिचे तुमच्या कारभारावर बारीक लक्ष असते, तेव्हा चांगली प्रतिमा जपा, बडेजाव नको; साधे राहा. बदल्यांच्या फायली घेऊन फिरत बसू नका. महायुतीचा धर्म पाळून पुढे जा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीचे सर्व आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत सांगितले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात तिन्ही पक्षांच्या मंत्री, आमदारांशी भावनिक संवाद साधताना काही कठोर मतेही व्यक्त केली, पैसा नाही तर चांगली प्रतिमा महत्त्वाची आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदींनी आम्हाला आमची दिनचर्या विचारली
पंतप्रधान मोदींनी आम्हाला आमची दिनचर्या विचारली. त्यात कुटुंबाला कधी वेळ देतात ते विचारले. योग, आरोग्याचे महत्व सांगितले. हा अनुभव अविस्मरणीय होता, महायुती भक्कम आहे. जनसंपर्क कसा वाढवावा, हे पंतप्रधान मोदींनी सांगितले. मोदींनी स्वत: कश्या पद्धतीने संघर्ष केला हेही सांगितले. त्यामुळे, प्रचंड ऊर्जा घेऊन आम्हाला यातून मिळाली आहे, असे शिवसेना शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, त्यासाठी दरवर्षी स्वतःचे मेडिकल चेकअप करून घ्यावे. कुटुंबाला वेळ द्यावा, घरातील पत्नी, मुलगी, आईकडे विशेष लक्ष द्यावे, कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊन देऊ नका, असा सल्ला मोदींनी दिल्याचे शिरसाट म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी पालक स्वरुपात होते, नरेंद्र मोदींच्या भेटीने महायुती अधिक मजबूत झाली. पंतप्रधान मोदींचे बोलणे ऐकून मंत्रमुग्ध झालो, असे भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी बोलत राहावेत आणि आम्ही ऐकत राहावे असे वाटत होते. जनसेवेचा वसा घेऊन जनसंपर्क वाढवा हा सल्ला दिला. तसेच पुढे जात असताना घराकडेही लक्ष द्यावे. अशा सूचना केल्या. दिनचर्या कशी असावी, आरोग्य कसे राहावे, याबाबत पंतप्रधानांनी मार्गदर्शन केले, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.