Join us

अंधेरी पूर्वच्या जागेवरून भाजप-शिंदेसेनेत जुंपणार

By मनोहर कुंभेजकर | Published: August 08, 2024 8:32 AM

...शिवसेनेकडे हा मतदारसंघ असल्याने त्यावर शिंदे सेना दावा सांगण्याच्या तयारीत आहे. तर भाजपनेही या मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

मनोहर कुंभेजकर -

मुंबई : महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू होण्याआधीच काही ठिकाणी संघर्षाची चिन्हे दिसत आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ कोणाकडे जाणार यावरून भाजप-शिंदेसेनेत जुंपण्याची शक्यता आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी व उद्धवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या. शिवसेनेकडे हा मतदारसंघ असल्याने त्यावर शिंदे सेना दावा सांगण्याच्या तयारीत आहे. तर भाजपनेही या मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती वर्षा बंगल्यावर नुकताच शिंदेसेनेत प्रवेश केला. स्वीकृती शर्मा येथून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे महायुतीत अंधेरी पूर्वच्या जागेवर शिंदेसेना दावा करणार आहे. मात्र, अंधेरी पश्चिमचे भाजप आमदार अमित साटम यांनी अंधेरी पूर्वची जागा भाजपच लढणार आणि जिंकणार, असा दावा नुकताच केला आहे. भाजपकडून येथे माजी नगरसेवक मुरजी पटेल हे संभाव्य उमेदवार आहेत. मुरजी पटेल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे मानले जातात. विशेष म्हणजे २०२२ च्या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांना दिलेली उमेदवारी नंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी मागे घेतली होती. त्यामुळे शिंदेसेना आणि भाजपने या जागेवर दावा केल्याने त्यांच्यात सध्या वादाची ठिणगी पडली आहे. 

-    पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके ६६,५३० मतांनी निवडून आल्या.-    अंधेरी पूर्व हा गेली १५ वर्षे शिवसेनेचा गड आहे. तो गड कायम राखण्यासाठी उद्धवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे.-    २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ७८,७६४ मते मिळाली तर उद्धवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना ६८,७४६ मते मिळाली.-    रवींद्र वायकर यांनी येथून १०,११८ मते अधिक मिळविली होती. त्यामुळे शिंदेसेनेचा या मतदारसंघावरचा दावा प्रबळ समजला जात आहे.

ऋतुजा लटके यांना पुन्हा उमेदवारी?आमदार ऋतुजा लटके यांना येथून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परत निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार की नवा चेहरा म्हणून अंधेरी पूर्व विधानसभा संघटक प्रमोद सावंत यांना संधी मिळणार, याची चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :राजकारणभाजपाशिवसेना