Join us

राज्यात भाजपा-शिवसेना युती 45 जागा जिंकणार; भाजपा प्रदेशाध्यक्षांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 11:43 IST

एक्झिट पोलच्या माध्यमातून जी काही आकडेवारी येत आहे त्यावरुन भाजपा बहुमतात येणार आणि 300 चा आकडा पार करणार असा विश्वास आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या देशाचे लक्ष निकालांकडे लागून राहिलं आहे. यंदाच्या निवडणुकीत बाजी मारुन केंद्रात कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता जनतेला आहे. त्यातच विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवलेले अंदाज एनडीएसाठी विशेषत: भारतीय जनता पार्टीसाठी सुखावणारे आहेत. महाराष्ट्रातही भाजपा-शिवसेना युती 45 जागा जिंकेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. 

पत्रकारांशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, देशातील आणि राज्यातील मतदारांनी मोदींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. एक्झिट पोलच्या माध्यमातून जी काही आकडेवारी येत आहे त्यावरुन भाजपा बहुमतात येणार आणि 300 चा आकडा पार करणार असा विश्वास आहे. देशातील जनतेने विरोधकांना नाकारलं आहे हे सिद्ध झाल्याचं त्यांनी सांगितले. 

तसेच महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीला 45 जागा मिळतील, काँग्रेस-राष्ट्रवादीला दोन आकडी संख्याही पार करता येणार नाही. जे चित्र लोकसभा निवडणुकीत दिसलं तेच विधानसभा निवडणुकीतही दिसेल. निवडणुकीत मोठा भाऊ अथवा छोटा भाऊ असं काही नाही. शिवसेना-भाजपा युतीमुळे 48 मतदारसंघात मोदीच उभे आहेत म्हणून मतदारांनी मतदान केले आहे. आमची मने मिळाली हेच विधानसभेत पुन्हा दिसेल असा दावाही रावसाहेब दानवे यांनी केला. 

दरम्यान उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीमुळे मतांमध्ये फूट पडेल पण जास्त परिणाम होणार नाही.  एक्झिट पोलच्या आकडेवारीवरुन देशातील जनतेचा कौल मोदींनाच असल्याचं दिसत असल्याचं रावसाहेब दानवेंनी सांगितले. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 22 जागा, शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा तर काँग्रेसला 2 जागा्ंवर समाधान मानावं लागलं होतं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या 22 जागांवरुन 19 जागांवर घसरण होईल तर शिवसेनेच्या खासदारांची संख्याही कमी होईल. शिवसेना यंदाच्या निवडणुकीत 15 जागा जिंकेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढताना पाहायला मिळत आहे. काँग्रेसला 8 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा मिळतील असा अंदाज टीव्ही 9 आणि सी-व्होटर यांनी वर्तवला आहे. तर एबीपी माझा आणि नेल्सनच्या एक्झिट पोलमधून महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 17 जागा शिवसेना, भाजपा 17 जागा, काँग्रेस 4 जागा तर राष्ट्रवादीला 9 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत तर इतर 1 जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळताना दिसत आहेत. 

महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेला बसणार फटका; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा होणार दुप्पट

टॅग्स :लोकसभा निवडणूक एक्झिट पोलभाजपाशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसनिवडणूक